मुंबई : करोनाच्या पाश्र्वभूमीवर लग्नसोहळे आणि अंत्यसंस्कारात किती लोकांनी सहभागी व्हावे याबाबत घालून दिलेली संख्यामर्यादा ही अन्य कार्यक्रमांसाठी सरसकट लागू केली जाऊ शकत नाही. उलट कार्यक्रम स्वरूप, कार्यक्रमस्थळाची क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार लोकांना छोटय़ा- मोठय़ा कार्यक्रमांत सहभागी होण्यास परवानगी देणे योग्य होईल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
लग्नसमारंभ आणि अंत्यसंस्काराप्रमाणेच अन्य छोटय़ा व मोठय़ा कार्यकमांत सहभागी होणाऱ्यांसाठीची संख्यामर्यादा निश्चित करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अविनाश घारोटे यांच्या खंडपीठाने या दोन्ही कार्यक्रमांचा नियम अन्य कार्यक्रमांना सरसकट लागू करता येऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. करोनाच्या पाश्र्वभूमीवर लग्नसमारंभांत ५०, तर अंत्यसंस्कारात २० व्यक्ती सहभागी होण्यास परवानगी आहे.
सरकारच्या अधिसूचनांमध्ये मोठय़ा सार्वजनिक कार्यक्रमाची व्याख्या वा त्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची कमाल संख्या नमूद नाही. अधिसूचनेत केवळ लग्नसोहळे आणि अंत्यसंस्काराबाबत नमूद असून त्यात किती व्यक्ती सहभाही होऊ शकतात याची मर्यादा निश्चित केली आहे. या दोन्ही कार्यक्रमांचे स्वरूप वेगळे आहे. त्यामुळे त्यांची मर्यादा ती अन्य मोठय़ा कार्यक्रमांसाठी लागू होऊ शकत नाही, असे आम्हाला वाटत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 1, 2020 4:12 am