मुंबईमधील आणखी सुमारे १८३ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून करोनाबाधितांची संख्या १९३६ पर पोहोचली आहे. तर दोन करोनाबाधितांना बुधवारी प्राण गमवावे लागले. परिणामी, मुंबईमधील मृतांची संख्या ११३ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे बुधवारी १७ जणांना घरी पाठविण्यात आले आहे.

मुंबईमधील २६१ करोना संशयितांना बुधवारी विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आले. त्यापैकी १८३ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. रुग्णालयात दाखल करोना संशयितांची संख्या ५३७९ वर, तर बाधितांची संख्या १९७९ वर पोहोचली आहे. बुधवारी दोघांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ११३ झाली आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात दाखल करोनाबाधितांपैकी १७ जणांची प्रकृती सुधारली असून त्यांच्या स्वॅबचे अहवाल नकारात्मक आले आहेत. त्यामुळे त्यांना बुधवारी घरी सोडण्यात आले. परिणामी, प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे घरी पाठविण्यात आलेल्यांची संख्या १८१ झाली आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात ५ एप्रिलपासून करोनाग्रस्त रुग्णांचा शोध सुरू करण्यात आला असून या भागात विशेष दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. सुमारे १०० विशेष दवाखान्यांमध्ये ५ ते १४ एप्रिल या काळात ३९२९ जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १३४१ संशयितांचे नमुने घेण्यात आले आहेत. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या ८५७ जणांचा शोध घेण्यात पालिका यशस्वी झाली आहे. शासकीय व निमशासकीय, पालिका इमारती, रुग्णालये, दवाखाने, करोनाबाधितांची घरे, अलगीकरण कक्ष आदी ३३ हजार ६३६ ठिकाणी र्निजतुकीकरण करण्यात आले आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकारासारखा दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये. या व्यक्तींनी नियमित उपचार घ्यावेत, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.