10 August 2020

News Flash

यंदाही खड्डय़ांतूनच जा!

 पावसाळा सुरू झाला की मुंबईच्या रस्त्यांची खड्डय़ांमुळे चाळण होण्यास सुरुवात होते.

मुंबई महापालिका ( संग्रहीत छायाचित्र )

पावसाळय़ापूर्वी सर्व खड्डे बुजवणे अशक्य; महत्त्वाच्या व्यक्तींची वर्दळ असलेल्या रस्त्यांची प्राधान्याने डागडुजी करण्याचा पालिकेचा निर्णय

मुंबईत पावसाळ्यात खड्डय़ांमुळे चाळण होणारे रस्ते गुळगुळीत करण्याकरिता ‘रामबाण’ तंत्रज्ञान आणण्यात महापालिकेला यश आले असले तरी प्रशासकीय दिरंगाईमुळे यंदा केवळ अति महत्त्वाच्या व्यक्तींचा वावर असलेल्या ‘व्हीआयपी’ रस्त्यांनाच याचा फायदा होणार आहे. खड्डे भरण्यासाठीचे मिश्रण स्वत:च्याच कारखान्यात तयार करण्याची योजना पालिकेने तयार केली असली तरी तिच्या अंमलबजावणीत विलंब झाल्याने मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी अपेक्षित मिश्रणाच्या केवळ एक चतुर्थाश मिश्रणच तयार होणार आहे. या मिश्रणाचा प्राधान्याने वापर केवळ अतिमहत्त्वाच्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी केला जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळय़ातही सर्वसामान्यांना खड्डय़ांतूनच वाट काढावी लागण्याची चिन्हे आहेत.

पावसाळा सुरू झाला की मुंबईच्या रस्त्यांची खड्डय़ांमुळे चाळण होण्यास सुरुवात होते. हे खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेला दरवर्षी सुमारे ११ हजार टन खडीमिश्रित डांबराचे मिश्रण लागते. हे मिश्रण वरळी येथील पालिकेच्या कारखान्यात तयार होते. मात्र पावसामुळे खड्डे बुजविण्यासाठी उष्ण मिश्रणाचा उपयोग होत नाही. या खड्डय़ांवर गेल्या वर्षी ऑस्ट्रिया व इस्रायल तंत्राचा वापर करत बनवलेल्या शीत मिश्रणाचा प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी ठरला. मात्र या एका किलोच्या मिश्रणासाठी महानगरपालिकेने तब्बल १८५ रुपये मोजले. त्यामुळे एक खड्डा भरण्यासाठी पालिकेला सुमारे १५ हजार रुपयांचा खर्च आला. हा खर्च खूप जास्त असून मुंबईतील सर्व खड्डे भरायचे म्हटले तर परवडणारा नाही. त्यामुळे गेल्या वर्षी पालिकेने विकत घेतलेल्या ३८ टन मिश्रणाचा उपयोग केवळ मुख्य रस्त्यांवरील खड्डय़ांसाठी केला गेला.

महानगरपालिकेने या वर्षी हे तयार मिश्रण परदेशातून घेण्याऐवजी यासाठी वापरण्यात आलेले साहित्य घेऊन वरळी येथील कारखान्यात हे मिश्रण तयार करण्याचे ठरवले आहे. यासाठी एका किलोसाठी ३० रुपयांपर्यंत खर्च येणार असल्याने किमान या वर्षी तरी हे मिश्रण सर्व रस्त्यांसाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे या वर्षीही मुंबईतील बहुतांश रस्त्यांवरील तळी बुजवण्यासाठी हे मिश्रण पुरेसे पडणार नाही.

पालिकेला दरवर्षी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ११ हजार टन मिश्रण लागते. पालिकेच्या योजनेनुसार यापुढे दरवर्षी पावसाळ्यासाठी १५० टन व पावसाळ्यानंतर ६० टन साहित्य विकत घेतले जाणार असून त्यातून दहा हजार टन शीत मिश्रण तयार होईल. यावर्षी हे उत्पादन जानेवारी- फेब्रुवारीमध्ये सुरू होणे अपेक्षित होते. हे मिश्रण तयार करण्यासाठी वरळी येथील कारखान्यात अतिरिक्त यंत्रही बसवावे लागणार आहे. मात्र अजून स्थायी समितीमध्ये प्रस्ताव संमत झालेला नाही. त्यानंतर कार्यादेश देऊन प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यासाठी जून उजाडणार आहे. साधारण जुलैपासून रस्त्यांवर खड्डे दिसू लागत असल्याने या वर्षी दहा हजार टनांऐवजी २५०० टन मिश्रण तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या मिश्रणाने केवळ महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवले जाणार आहेत. मात्र हे मिश्रणही बहुतांश रस्त्यांसाठी पुरेसे असेल, असा पालिका अधिकाऱ्यांचा दावा आहे. उष्ण मिश्रणाचा उपयोग होत नसल्याने एक खड्डा वारंवार भरावा लागतो व मिश्रणाचे प्रमाण वाढते. मात्र शीत मिश्रणाने बुजवलेल्या खड्डय़ातील मिश्रण टिकाऊ असल्याने ते पावसाळ्यात वाहून जात नाही. परिणामी एकच खड्डा पुन्हा भरावा लागत नाही. एक-दोन वर्षे मिश्रण टिकल्याने कमी मिश्रणातही अनेक रस्त्यांवरील खड्डे भरता येतील, असा विश्वास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

भर पावसात खड्डे भरण्यासाठी अधिक चांगल्या क्षमतेचे अ‍ॅडिटिव वापरले जाणार असल्याने त्याची किंमत अडीचपट अधिक आहे. पावसाळ्यानंतर खड्डय़ांसाठी तेवढय़ा क्षमतेच्या अ‍ॅडिटिवची गरज नाही. पावसाळ्यानंतर उष्ण मिश्रणानेही खड्डे नीट भरले जातात.

विनोद चिठोरे, प्रमुख अभियंता, रस्ते व वाहतूक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 4:36 am

Web Title: potholes issue in mumbai bmc
Next Stories
1 सात सोसायटय़ांवर दंडात्मक कारवाई
2 प्लास्टिकबंदीमुळे स्टीलच्या किटल्यांना भाव
3 बहुमजली इमारतींविरोधातील याचिका निकाली
Just Now!
X