फोन टॅपिंगप्रकरणी चौकशी करण्यासाठी सायबर विभागाने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी पुन्हा समन्स बजावले आहे. त्यांना ३ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

यापूर्वी सायबर पोलिसांनी शुक्ला यांना समन्स बजावून शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. शुक्ला यांनी करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी हैदराबाद येथून मुंबईत येणे शक्य नसल्याचे सायबर पोलिसांना ईमेलद्वारे कळविले होते. तसेच तपास अधिकारी प्रश्न पाठवू शकतात. त्या प्रश्नांची उत्तरे ई-मेलद्वारे पाठवेन, असे त्यांनी सांगितले होते. दरम्यान शुक्ला यांच्या उत्तराने तपास अधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही. तसेच पोलिसांना शुक्ला यांची समोरासमोर चौकशी करायची असल्याने सायबर पोलिसांनी त्यांना पुन्हा समन्स बजावले असून ३ मे रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.