11 August 2020

News Flash

पर्यायी घरात जाण्यास बीडीडी चाळ पुनर्विकासातील रहिवाशांना घाई

‘करोना’चा असाही फायदा; सामाईक शौचालयांमुळे संसर्गाचा धोका

‘करोना’चा असाही फायदा; सामाईक शौचालयांमुळे संसर्गाचा धोका

निशांत सरवणकर, लोकसत्ता

मुंबई : टाळेबंदीमुळे बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास तातडीने सुरू करण्याची मागणी तेथील रहिवासी करू लागले आहेत. या रहिवाशांना तातडीने पर्यायी जागेत स्थलांतरित व्हायचे आहे. विविध मागण्यांसाठी अडून बसलेले हे रहिवासी आता आम्हाला संक्रमण शिबिरातील घरे तातडीने द्या म्हणून म्हाडाकडे तगादा लावत आहेत. करोनामुळे होणाऱ्या संसर्गाने ते भयभीत झाले आहेत.

दक्षिण मुंबईतील ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी येथील सुमारे ९२ एकर मोक्याच्या भूखंडावर पसरलेल्या १९५ चाळींतील सुमारे साडेपंधरा हजार भाडेकरूंच्या पुनर्विकासाचा मोठा प्रकल्प म्हाडाकडून राबविला जात आहे. या तिन्ही प्रकल्पासाठी म्हाडाने कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. ना. म. जोशी मार्गासाठी शापुरजी पालनजी, नायगावसाठी एल.अँड.टी आणि वरळीसाठी टाटा कॅपेसाईट या बडय़ा विकासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र २२ मार्चपासून टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर या प्रकल्पांचे काम पूर्णत: ठप्प झाले आहे. हे काम कधी सुरू होणार याबाबत आता रहिवाशीच चौकशी करू लागले आहेत, असे या प्रकल्पाशी संबंधित म्हाडातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

एन. एम. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील २६६ रहिवाशांचे संक्रमण शिबिरात स्थलांतर करण्यात आले आहे. वरळी येथे नमुना सदनिका उभारण्यात आली आहे तर नायगाव येथील रहिवाशांच्या संघटनेकडून आपल्या मागण्या पुढे करीत काही प्रमाणात अडथळे आणण्यात आले होते. मात्र आता रहिवासी स्वत:हून संक्रमण शिबिरातील सदनिका कधी देता, अशी विचारणा करीत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

या सर्व बीडीडी चाळींतील सदनिकांचे आकारमान १६० चौरस फूट असून २० सदनिकांसाठी साधारणत: सहा शौचालये आहेत. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर या रहिवाशांचे धाबे दणाणले. हे तिन्हीही परिसर अतिसंक्रमित विभागात येत आहेत. सामाईक शौचालयांमुळे या परिसरात अनेक करोनाबाधित आढळले. त्यामुळे रहिवासी आता म्हाडाला संक्रमण शिबिरातील सदनिका लवकर देण्याची विनंती करीत आहेत. संक्रमण शिबिरातील सदनिकेत घरातच शौचालय असल्यामुळे करोनासारख्या रोगाचा संसर्ग होणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. जे संक्रमण शिबिरात राहायला गेले आहेत तेथे करोनाबाधित आढळले नाहीत. त्यामुळे आता या रहिवाशांनाही लवकरात लवकर पर्यायी जागेत स्थलांतरित व्हायचे असल्याकडेही या अधिकाऱ्याने लक्ष वेधले. मात्र आता या रहिवाशांना करारावर सह्य कराव्या लागणार आहेत. अन्यथा त्यांना संक्रमण शिबिरातील सदनिका वितरित करणे कठीण होणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. ना. म. जोशी मार्ग बीडीडीवासीयांसाठी उभारलेल्या संक्रमण शिबिरात सदनिका रिक्त असल्या तरी तेथील वास्तव्याला असलेल्या रहिवाशांनी येऊ देण्यास नकार दिला आहे. याबाबत तोडगा काढावा लागणार असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 4:07 am

Web Title: residents in the bdd chawl redevelopment rush to move to an alternative home zws 70
Next Stories
1 ‘वकिलांनाही विशेष लोकलमधून प्रवासाची परवानगी देणार का?’
2 मुंबईत सांसर्गिक आजारांवरील उपचारांसाठी रुग्णालय उभारण्याची गरज
3 फेरीवाल्यांमुळे संसर्गाचा धोका
Just Now!
X