खेळाचे मैदान म्हणून राखीव असलेले मुंबईतील २३५ भूखंड परत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी खेळाच्या मैदानांवर उभारण्यात आलेला कांदिवली येथील सचिन तेंडूलकर जिमखाना आणि जोगेश्वरी येथील मातोश्री क्लब या यादीत नसल्याचे दिसून येते. स्थानिक रहिवाशांची खेळाची मैदाने हिरावून घेऊन मुठभर धनिकांसाठी क्लबसंस्कृती उभारून ही मैदाने कायमस्वरुपी गिळंकृत केली आहेत. या दोन्ही भूखंडावर ही क्लब चालविणाऱ्या कंत्राटदारांनी मात्र आपली पोळी भाजून घेतली आहे.

या दोन्ही क्लबविरुद्ध लोकसत्ताने ऑगस्ट २०१५ मध्ये ‘क्लबचा खेळ’ अशी वृत्तमालिका प्रसिद्ध करून मुळात खेळाचे मैदान म्हणून आरक्षित असलेल्या या भूखंडावर मुठभर धनिकांसाठी कशी क्लब संस्कृती राबविण्यात आली आहे, याचे विवेचन करण्यात आले होते. नागरिकांना मोकळ्या मैदानात श्वास घेता यावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनीच असे भूखंड परत घेण्याचे आदेश दिल्यानंतर पालिकेने यादी तयार केली खरी. परंतु या यादी काही भूखंडांचा समावेशच नसल्याचे आढळून येते. याबाबत यादी आणखी अद्ययावत होऊ शकते, असे संदिग्ध उत्तर दिले जाते.

पश्चिम उपनगरातील युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला खुल्या भूखंडाची आवश्यकता होती. एमसीएचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवारांनी तसे पालिका आयुक्तांना पत्र लिहिले आणि तत्कालीन शासनाने पवार यांचे म्हणणे मान्य केले. काळजीवाहू पद्धतीने हा भूखंड एमसीएकडे २००३ मध्ये सोपविला. २००४ मध्ये एमसीएने क्रिकेट अकादमी विकसित करण्यासाठी परवानगी मागितली. परंतु इतक्या वर्षांंत युवा खेळाडूंसाठी अकादमी उभी राहिली नाही. मात्र मे. शिर्के बिल्डर्सबरोबर व्यापारी करार करून डोळे दिपविणारा आलिशान क्लब मात्र उभा राहिला. सर्व सुविधा पुरविण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च करण्यात आल्यामुळे सुविधा फुकट देता येणार नाही, असा युक्तिवाद असोसिएशनच्या वतीन मानद सचिव पी. व्ही. शेट्टी यांनी केला होता.

जोगेश्वरी पूर्वेतील खेळाचे मैदान म्हणून आरक्षित असलेला पालिकेच्या मालकीचा पाच एकर भूखंड १९९६ मध्ये विद्यमान गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर अध्यक्ष असलेल्या मे. मातोश्री आर्टस् अँड स्पोर्टस् ट्रस्टला दिला. एकूण भूखंडाच्या १५ टक्के भूखंडावर जलतरण तलाव वा अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रमुख अट होती.

तसेच यासाठी आवश्यक असणाऱ्या इमारतीचे काम ५० टक्के भूखंडावर व उर्वरित ५० टक्के भूखंड हा स्थानिकांच्या वापरासाठी खुला ठेवण्याचेही बंधन होते. याशिवाय महापालिका जलतरण तलाव व क्रीडा संकुल असा फलकही लावण्यास सांगण्यात आला होता. परंतु या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले असून या क्लबमध्ये स्थानिकांना सदस्य असल्याशिवाय प्रवेश नाही.

  • सचिन तेंडूलकर जिमखाना –

सदस्य शुल्क : १० लाख; भूखंड : दहा एकर.

  • मातोश्री क्लब –

सदस्य शुल्क – तीन ते पाच लाख; भूखंड : पाच एकर