मुंबईतील अनेक संस्थांचा पुढाकार

मुंबई : वादळी वारा आणि मुसळधार पाऊस यांमुळे सोमवारी मुंबईतील शेकडो झाडे उन्मळून पडली. मोठय़ा प्रमाणात झाडांची पडझड झाल्याने झाडांवर असलेली घरटीही उद्ध्वस्त झाली. परिणामी रस्त्यांवर पडलेल्या पक्ष्यांना जीवनदान देण्यासाठी मुंबईतील काही संस्थांनी पुढाकार घेत शेकडो जीवांचे प्राण वाचवले.

वन्य जीवांसाठी काम करणाऱ्या ‘रेसक्वीन असोसिएशन ऑफ वाईल्ड लाइफ’ (रॉ) या संस्थेने ६५ हून अधिक प्राणी-पक्ष्यांचे प्राण वाचवले आहे. सांताक्रुझ, जोगेश्वरी, गोरेगाव ठाणे, मीरारोड, मुलुंड, घाटकोपर, विक्रोळी, अंधेरी, चेंबूर अशा विविध उपनगरांतून जवळपास ३२ घारी, ५ कबुतरे, ११ पोपट, ४ कावळे आणि इतर अनेक पक्ष्यांना जीवदान देण्यात आले. केवळ पक्षीच नव्हे, तर सापांच्या विविध प्रजाती आणि ठाणे परिसरातून एका कोल्ह्यासही त्यांनी वाचवले.

डब्ल्यूडब्ल्यूए संस्थेनेही ५० हून अधिक प्राणी-पक्ष्यांना सुखरूप ठेवण्याचे काम केले. पावसात जखमी झालेल्या ६ घारी, १८ कावळे, ४ कबुतरे, चार बगळे आणि इतर विविध प्रजातींचे पक्षी अशी नोंद संस्थेने के ली आहे. तर ५ साप, ६ खारी, १ माकड यांचीही सुटका करण्यात आली.

मुंबईतील अजय सिंग या तरुणाने पावसाने भिजलेल्या, उडू न शकणाऱ्या १५ हून अधिक घारी पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवले. पाऊस थांबल्यानंतर त्यांच्या पंखात बळ आल्याची खात्री करून त्याने त्या घारींना मुक्त केले. तर पार्लेश्वर संस्थेने विलेपार्ले आणि जोगेश्वरी भागांतून कबुतर, घार, चिमणी, फ्लेमिंगो, कोकिळा अशा पक्ष्यांना अभय दिले.