बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी अभिनेते शेखर सुमन वारंवार सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. आपल्या याच मागणीसाठी नुकतीच त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भामला फाऊंडेशनचे आसिफ भामला व अरुण मोटवानी उपस्थित होते. शेखर सुमन यांनी राज्यपालांकडे सीबीआयमार्फत चौकशी केली जावी अशी विनंती केली असून तसं निवेदनही दिलं आहे.

शेखर सुमन आस‍िफ भामला व अरुण मोटवानी यांच्यासहित राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवन येथे मंगळवारी पोहोचले होते. या भेटीनंतर राज्यपालांनी ट्विट करत माहिती दिली की, “अभिनेते शेखर सुमन यांनी राजभवन मुंबई येथे भेट घेऊन सुशांत सिंह राजपुत प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी आस‍िफ भामला व अरुण मोटवानी उपस्थित होते”.

दरम्यान शेखर सुमन यांनी राज्यपालांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या आस‍िफ भामला यांचे खूप आभार. न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक दरवाजा ठोठावण्यास मी तयार आहे”.

शेखर सुमन सुरुवातीपासूनच सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी रोज नवीन दावे आणि खुलासे केले जात आहेत. सुशांतच्या मृत्यूचा तपास आता मुंबईसह बिहार पोलिसांनीही सुरु केला आहे. सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पाटणा पोलिसांनी प्रेयसी रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोबतच आर्थिक व्यवहारांचा आरोप असल्याने ईडीदेखील तपास करत आहे.