News Flash

गणेशभक्तांसाठी एसटी आणि रेल्वे सज्ज

दोन दिवसांत एसटीच्या दोन हजार जादा गाडय़ा जाणार

(संग्रहित छायाचित्र)

गणेशोत्सवानिमित्त कोकणाच्या दिशेने एसटी महामंडळाकडून ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी नियमित गाडय़ांबरोबरच सुमारे दोन हजार जादा गाडय़ा रवाना होणार आहेत. याशिवाय खासगी बसगाडय़ाही सुटणार असल्याने मुंबई ते गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवणे प्रशासनासमोर आवाहन असेल. या मार्गावर शासनाने ३० ऑगस्टपासून अवजड वाहनांना टप्प्याटप्प्याने बंदी घातली आहे.

दरवर्षीप्रमाणे एसटी महामंडळाने यंदाही गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी नियमित गाडय़ांबरोबरच जादा गाडय़ा सोडण्याचेही नियोजन केले आहे. या वेळी २,२०० जादा गाडय़ांची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत २ हजार १४५ गाडय़ा हाऊसफुल्ल झाल्या असून ५५ बसगाडय़ांचे आरक्षण अद्यापही होत आहे. गेल्या वर्षी एसटीच्या २ हजार १३९ जादा बसगाडय़ा हाऊसफुल्ल झाल्या होत्या. त्या तुलनेने यंदा एसटीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एसटीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकणासाठी २८ ऑगस्टपासून जादा गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. त्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. मात्र २ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होत असून कोकणात जाण्यासाठी ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी मोठी गर्दी एसटी गाडय़ांना आहे. या दोन दिवसांत १ हजार ९२५ जादा गाडय़ा कोकणच्या दिशेने रवाना होतील. यामध्ये शुक्रवारी ३६४ बस आणि ३१ ऑगस्ट रोजी १ हजार ५६३ बस सुटतील. याशिवाय प्रत्येक दिवशी १५० नियमित बसही कोकणासाठी जातील.

मुंबई ते गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

३० ऑगस्टपासून मोठय़ा प्रमाणात कोकणाच्या दिशेने एसटी, खासगी वाहने जातील. त्यामुळे मुंबई ते गोवा मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवणे महामार्ग पोलिसांसमोर आव्हान असेल. गणेशात्सव काळात मुंबई ते गोवा मार्गावरून वाहन चालकांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ३० ऑगस्ट ते १३ सप्टेंबपर्यंत टप्प्याटप्प्याने बंदी लागू होईल. यातून भाजीपाला, दूध, पेट्रोल, गॅस सिलेंडर यासह जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे.

परतीच्या प्रवासातही एसटीत तुडुंब गर्दी

७ सप्टेंबरपासून कोकणातून मुंबई, ठाणे, पालघरच्या दिशेने येणाऱ्या जादा गाडय़ांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ७ सप्टेंबर रोजी १८६, तर ८ सप्टेंबर रोजी ८५१ गाडय़ांचे आरक्षण झाले असून ९ सप्टेंबर रोजी हाच आकडा ४८९ पर्यंत पोहोचला आहे.

१६ सप्टेंबपर्यंत परतीच्या प्रवासात २ हजार ४२ गाडय़ा आरक्षित झाल्या आहेत. आता ६० दिवस अगोदर आरक्षण खुले केल्याने त्याचा मोठा फायदा प्रवाशांना झाल्याचे सांगितले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 1:55 am

Web Title: st and railways ready for ganesh devotees abn 97
Next Stories
1 पेण गणेशमूर्ती व्यवसाय : समूह विकास योजना रखडली
2 मातीशी मैत्री
3 अनन्यसाधारण महत्त्व असलेलं ‘हरितालिके’चं व्रत का करतात?
Just Now!
X