तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील…मुंबईची भाषा हिंदी या वादावर अखेरीस पडदा टाकण्यात आलेला आहे. निर्माते असित मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन…’तारक मेहता’ची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांच्याकरवी व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने सर्वांना सामावून घेतलं आहे. या अर्थाने मुंबईची भाषा हिंदी हे वाक्य वापरण्यात आलं होतं. आम्ही प्रत्येक प्रांताचा-धर्माचा आणि भाषेचा सन्मान करतो. पण मालिकेत प्रसारित झालेल्या संवादामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर यासाठी आम्ही माफी मागतो, या शब्दांत निर्मात्यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.

नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात, या मालिकेतील जेठालालचे वडील बापुजी यांच्या तोंडी, मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. प्रसारित झालेल्या भागात प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मातृभाषेमधूनच संवाद साधणार असा पण करतो. यातून तयार झालेल्या विसंवादामध्ये बापुजी हे पात्र मध्यस्थी करतं आणि सर्वांचं मनोमिलन घडवून आणतं. यादरम्यान…बापुजींच्या तोंडी, मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे.