मुंबई : वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ‘टाळेबंदी’ असे थेट न म्हणता लागू केलेल्या निर्बंधांमुळे टाळेबंदीसदृश परिस्थिती सोमवारी रात्री आठपासून  निर्माण होणार असली तरी स्पष्ट सूचना नसल्यामुळे सोमवारी बाजारपेठांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. आठवडाअखेरीस टाळेबंदी जाहीर करण्यात आली असली तरी इतर दिवशी कोणती दुकाने सुरू राहणार याबाबत व्यापाऱ्यांना कल्पना नसल्याचे दिसले. मात्र वेळेच्या निर्बंधांमुळे सोमवारपासूनच बाजारपेठांमधील गर्दी ओसरल्याचे दिसत होते.

करोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत असल्याने रविवारी राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले. सोमवारी रात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. परंतु या आदेशाविषयी दुकानदारांमध्ये संभ्रम होता. क्रॉफर्ड मार्केट परिसरातील दुकाने बंद ठेवण्याची सूचना पोलिसांनी सोमवारी सकाळपासूनच देण्यास सुरुवात केली. त्यामुळे मंगलदास मार्केट, इलेक्ट्रिकल मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली नव्हती. तर काही व्यापाऱ्यांनी दुकानाचे दार अध्र्यावर उघडले होते. या ठिकाणी पथारी व्यावसायिकांनीही त्यांची दुकाने लावली नव्हती. मात्र सोमवारी बाजार सुरू असल्याचे स्पष्ट होताच दुपारनंतर काहीवेळ व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. मात्र बाजारात ग्राहकांची वर्दळ मात्र थंडावली होती. सकाळी दुकाने बंद करायला सांगितली होती. मात्र १२ वाजता दुकाने उघडली. उद्यापासून कपडय़ांची आणि इतर साहित्यांची दुकाने सुरू असतील की नाही याबाबत अजून स्पष्टता नाही, असे फ्लोरा प्लास्टिक या दुकानाचे सोहेल कुरेशी यांनी सांगितले.

दादर, माहीम, माटुंगा, धारावी, हिंदमाता, परळ परिसरातील दुकाने सोमवारी खुली झाली, परंतु कठोर निर्बंध लागू केल्यानंतर अपेक्षित असलेली गर्दी मात्र बाजारपेठांमध्ये दिसली नाही.

‘केवळ शनिवार- रविवार दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश आम्हाला माहीत आहे. उद्यापासून ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार हे नव्याने समजले. तसे झाल्यास मोठे नुकसान होईल. लोक लग्न खरेदीसाठी आता कुठे बाहेर पडू लागले होते. त्यांनी कुठे जायचे,’ असा प्रश्न पेथानी साडी या दुकानाच्या मालकांनी उपस्थित के ला आहे. हीच स्थिती धारावी, माटुंगा, परळ, लालबाग इथल्या दुकानदारांची होती.

भाजी बाजारात गर्दी

दादर येथील भाजी बाजारात गर्दी उसळली होती. दादर स्थानकापासून ते सेनापती बापट मार्गावर भरणाऱ्या या बाजरात किरकोळ विक्रेते, ग्राहक मोठय़ा संख्येने खरेदीसाठी जमले. यामध्ये मुखपट्टी आणि अंतर नियमांना धाब्यावर बसवण्यात आले. सोमवारी सकाळीपासून गर्दीने भरलेले दादरमधील फुलांचा बाजारही सायंकाळपर्यंत गजबजलेला होता. दुकानांबाहेरची गर्दी, लोकांच्या नाकाखाली मुखपट्टी असे काहीसे चित्र भाजी, फुलांच्या बाजारात दिसत होते.

कार्यालयात जाणाऱ्यांची संख्या घटली

परळ स्थानकाबाहेर पश्चिम बाजूला सकाळी कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. सोमवारी मात्र याउलट परिस्थिती होती. रस्ते, रेल्वे, बस स्थानके येथील गर्दी तुलनेने घटल्याचे दिसत होती.