दोन महिन्यांपूर्वी ११ मार्च रोजी मुंबईत करोना व्हायरसचे फक्त दोन रुग्ण होते. त्यानंतर दोन महिन्यांनी महाराष्ट्रातील एकूण रुग्ण संख्येपैकी मुंबईत ६१.२ टक्के रुग्ण आहेत. मुंबईत मृत्यूदर ३.४५ टक्के असून आतापर्यंत ८८२ मृत्यू झाले आहेत. चौथा लॉकडाउन सुरु आहे. पण अजूनही रुग्णसंख्या कमी झालेली नाही. साखळी तोडण्यात यश मिळालेले नाही. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

मुंबईत वाढलेली ही रुग्णसंख्या कधीपर्यंत कमी होऊ शकते?

मुंबईत करोनाचे पहिले १०० रुग्ण तयार होण्यासाठी २० दिवस लागले. ११ मार्च ते ३१ मार्च या काळात मुंबईने शंभरीचा आकडा गाठला. त्यानंतर १० दिवसांनी १० एप्रिलला मुंबईत करोना रुग्णांचा आकडा १ हजारपर्यंत पोहोचला. २६ दिवसानंतर सहा मे रोजी १० हजार, १७ मे रोजी मुंबईत करोनाचे २० हजार रुग्ण झाले.

“करोना रुग्णांचे संख्या वाढण्याचे हे प्रमाण अपेक्षित होते. दुसऱ्या देशांमध्ये काय स्थिती होती त्याचा आम्ही अभ्यास सुरु केला आहे. नऊ मार्चला महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण आढळला. तो पर्यंत इटली, फ्रान्स, स्पेन, इराण या देशांमध्ये करोनाने पसरायला सुरुवात केली होती. त्यामुळे मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढणे आम्हाला अपेक्षितच होते. त्यामुळेच केंद्राच्या आधी महाराष्ट्राने लॉकडाउन जाहीर केले” असे राज्याचे निरीक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त आयएस चहल यांनी आठ मे रोजी पदभार स्वीकारला. ‘मे अखेरपर्यंत मुंबईत ४५ ते ४६ हजार पर्यंत करोनाची रुग्णांची संख्या असू शकते’ असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. प्रदीप आवटे यांनी चीनचे उदहारण दिले. लॉकडाउन जाहीर केल्यानंतर चीनमध्ये ७२ दिवसांनी रुग्ण संख्या कमी होण्यास सुरुवात झाली. झोपडपट्टी, लोकसंख्या लक्षात घेता मुंबईत चीनच्या तुलनेत १० ते १२ दिवस जास्त लागू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे.

“मागच्या दोन महिन्यांपासून आपण लॉकडाउनमध्ये आहोत. मे जे अजून आठ दिवस बाकी आहेत. मे अखेरीस आपले ७० दिवस पूर्ण होतील. जागतिक सरासरीच्या तुलनेत मुंबईला आपण आणखी १५ दिवस जास्त देऊ. त्यामुळे जूनच्या मध्यपासून रुग्णसंख्या कमी झाली पाहिजे” असे प्रदीप आवटे यांनी सांगितले.