मुंबई: यापूर्वी मुंबईतील गुन्हे शाखेत महत्त्वाच्या पदांवर काम केलेल्या १० सहाय्यक पोलीस आयुक्तांची पुन्हा मुंबईत बदली करण्यात आली आहे.
संजय डहाके, महेश मुगुटराव, अविनाश पालवे, ज्योत्स्ना रासम, सूर्यकांत बांगर, कल्पना गाडेकर, मृत्युंजय हिरेमठ, रेणका बुवा, शशिकांत माने, सुहास कांबळे हे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) मुंबईत परतले आहेत. त्यातील बहुसंख्य अधिकारी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासोबत गुन्हे शाखेत कार्यरत होते. अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास त्यांनी केला होता. त्यांच्याशिवाय मुंबईत कार्यरत सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज खंडाळे यांची गुन्हे प्रकटीकरण प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी गृह विभागाने जारी केले.
गेल्या आठवड्यात राज्यभरातील ५०० हून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या ११ सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या काळात यातील बहुसंख्य अधिकाऱ्यांची मुंबई बाहेर बदली करण्यात आली होती.