मुंबईतील गोकुळदास तेजपाल रुग्णालय (जी. टी. हॉस्पिटल) येथे राज्यातील १०० वी कोरोना चाचणी प्रयोगशाळा शनिवारी सुरू झाली. भविष्यात करोना विषाणूसारखे कोणतेही संकट आले तरी राज्याची आरोग्य यंत्रणा तत्पर करून ती अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य सुविधांना प्राधान्य देत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी स्पष्ट केले.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने मुंबईतील गोकुळदास तेजपाल रुग्णालयात (जी.टी. हॉस्पिटल) राज्यातील १०० व्या कोरोना विषाणू रुग्ण चिकित्सा केंद्राचे ई-लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल, वरळीतील एनएससीआयचा डोम, गोरेगाव येथे युद्धपातळीवर कोविडसाठी ‘फिल्ड रुग्णालये’ उभारण्यात आली आहेत. करोनाविरुद्धच्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र देशात पुढेच आहे. आपण महाराष्ट्रात उभारलेल्या ‘फिल्ड रुग्णालयां’सारखी रुग्णालये दिल्लीतदेखील उभारण्यात येत आहेत. मुंबई, ठाण्यात सर्व सुविधांयुक्त रुग्णालयांची निर्मिती होते, ही कामगिरी थक्क करणारी असून हे आपल्या सर्वाच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे, असे नमूद करत रुग्णालये, आरोग्य सुविधा निर्माण करीत आहोत, मात्र त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केली.

आपण महाराष्ट्रात सर्वाधिक करोना तपासणी केंद्रे सुरू केली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात सर्वाधिक करोना चाचण्या झाल्या आहेत. आपण ऑक्सिजन, डायलिसिस मशीन्स, व्हेंटिलेटर्स याची उपलब्धता करण्याबरोबरच रक्तद्रव (प्लाझ्मा) उपचारासाठीही प्रयोगशील आहोत, त्यामुळे आपण कोणत्याही बाबतीत उपचारात मागे नाही असे त्यांनी सांगितले.

‘दिवसाला ३८ हजार चाचण्या’

मार्च महिन्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळला तेव्हा महाराष्ट्रात फक्त पुणे आणि कस्तुरबा रुग्णालयात चाचण्यांची सुविधा होती, मात्र आज महाराष्ट्रात १०० हून अधिक प्रयोगशाळांमध्ये करोनाची तपासणी होत आहे. शासकीय तपासणी केंद्रांत १७ हजार ५००, तर खासगी केंद्रांमध्ये २० हजार ५०० अशा जवळपास ३८ हजार चाचण्या एका दिवसात होत आहेत. याचाच अर्थ अडीच महिन्यांतच आपण ही यंत्रणा उभी केली आहे. महाराष्ट्राने केलेले काम पथदर्शक ठरेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला.