मुंबई : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीअंतर्गत प्रवेश निश्चित करण्याचा २१ जुलै हा अंतिम दिवस असून, त्यापूर्वीच शिक्षण संचालनालयाने तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार २१ जुलै रोजी विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग तर २२ ते २३ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीसाठी अर्जाचा दुसरा भाग भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अकरावीच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशाची मुदत २१ जुलै राेजी संपणार आहे. त्यापूर्वीच शिक्षण संचालनालयाकडून तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार २१ जुलै रोजी विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करून अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे. तर २२ ते २३ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे. तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील २३ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
रिक्त जागांचा तपशील जाहीर झाल्यानंतर तिसऱ्या फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. गुणवत्ता यादीमध्ये जागा जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना २६ ते २८ जुलैदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यातील ९ हजार ४६९ महाविद्यालयांमध्ये २१ लाख २३ हजार ७२० इतक्या जागा उपलब्ध आहेत. यातील १६ लाख ७० हजार ५९८ नियमित फेऱ्यांसाठी तर ४ लाख ५३ हजार १२२ जागा कोट्यांतर्गत प्रवेशासाठी राखीव आहेत.
शिक्षण संचालनालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या फेरीनंतर ५ लाख ८ हजार ९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये कोट्यांतर्गत ७५ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर नियमित फेरीअंतर्गत ४ लाख ३२ हजार २८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तसेच दुसऱ्या फेरीसाठी २ लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थांना जागा जाहीर झाल्या आहेत. यातील आतापर्यंत १ लाख ७० हजार ४५८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यामध्ये कोट्यांतर्गत ३२ हजार १७९ विद्यार्थ्यांनी तर नियमित फेरींतर्गत १ लाख ३८ हजार २७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.