मुंबई: राज्यातील विविध प्रकल्प रुळावर आणण्यासाठी त्यांना निधीचे बळ देण्यात आले आहे. एकूण १३ हजार ५३९ कोटी रुपयांची तरतूद २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली असून यापैकी १० हजार ६०० कोटी रुपये मध्य रेल्वेच्या वाटय़ाला आले आहेत. तर उर्वरित निधी मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबईतील प्रकल्प आणि अन्य विभागांसाठी प्रस्तावित आहेत.

 केंद्रीय अर्थसंकल्पात मध्य रेल्वेला पूर्णत: नव्या मार्गिकांच्या कामांसाठी एकूण १ हजार ६८५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून, सर्वाधिक ६०० कोटी रुपयांची तरतूद वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ पुसद या २७० किलोमीटर मार्गिकेसाठी आहे. तर अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ मार्गिकेसाठीही २५० कोटी, सोलापूर-उस्मानाबाद-तुळजापूर मार्गासाठी ११० कोटी आणि धुळे-नर्दाना मार्गिका, कल्याण-मुरबाड व्हाया उल्हासनगर आणि बारामती-लोणांद मार्गासाठी प्रत्येकी १०० कोटी रुपयांची, तर फलटण-पंढरपूर या १०५ किलोमीटर मार्गिकेच्या बांधकामासाठीही २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या अतिरिक्त मार्गिकांच्या कामांसाठी एकूण २ हजार ७०२ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. यापैकी कल्याण – कसारा तिसऱ्या मार्गिकेसाठी ९० कोटी, पुणे – मिरज – लोंडा दोन मार्गिकांसाठी ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर वर्धा – नागूपर तिसरा मार्ग, वर्धा – बल्लारशहा तिसरा मार्ग, इटारसी – नागपूर, दौंड – मनमाड दोन मार्गिका, वर्धा – नागपूर चौथी मार्गिका, मनमानड – जळगाव तिसरा आणि जळगाव – भुसावळ चौथ्या मार्गिकेच्या कामांसाठीही निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. 

विविध कामांना चालना

’मुंबई सेन्ट्रल, प्रभादेवी स्थानकांजवळील आणि दादर येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांसाठी निधी

’अंधेरी, वांद्रे, खार रोड, मालाड स्थानकांत नवीन पादचारी पुलांचे काम – १ कोटी ५७ लाख रुपये

’सांताक्रुझ, अंधेरी, गोरेगाव, मालाड, नायगाव, नालासोपारा, वसई रोड स्थानकांत पादचारीपुलांचे काम – १ कोटी ३ लाख रुपये

’७० उद्वाहक -४ कोटी ४४ लाख रुपये

’१८ सरकते जिने – १० कोटी रुपये यासह अन्य कामांसाठीही निधी मिळाला आहे.

प्रकल्पांसाठी निधीची तरतूद

’पनवेल – कळंबोली कोचिंग टर्मिनस – १० कोटी रुपये

’सीएसएमटीतील १० ते १३ क्रमांक फलाटाची लांबी वाढविणे (२४ डब्यांसाठी) – १० कोटी रुपये

’पुणे स्थानकातील फलाटांची लांबी वाढविणे

 (२४ आणि २६ डब्यांसाठी) – २५ कोटी रूपये

’विक्रोळी उड्डाणपूल – ४ कोटी रुपये

’दिवा उड्डाणपूल – ५ कोटी रुपये

’रत्नागिरी रेल्वे कारखाना – ८२ कोटी रुपये

’पादचारी पूल, बोगद्यांची कामे, सिग्नल यंत्रणा इत्यादी कामे – ७७६ कोटी रुपये

मुंबई – दिल्ली प्रवास वेगवान

मुंबई  -दिल्ली प्रवास वेगवान घडवण्यासाठी या मार्गावरील रुळांची क्षमता वाढवितानाच सिग्नल, ओव्हरहेड वायर, पुलांची दुरुस्ती, संरक्षक िभत यासह अन्य तांत्रिक कामे करावी लागणार आहेत. सध्या काही कामांना सुरुवात झाली असून मार्च २०२४ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे. याच कामांसाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात १ हजार ३२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पानंतर मार्गावरील वेग प्रतितास १३० किलोमीटरवरून १६० किलोमीटपर्यंत वाढणार आहे. परिणामी, दिल्लीपर्यंत राजधानी एक्स्प्रेसचा होणारा १६ तासांचा प्रवासही १२ तासांत शक्य.

मध्य प्रदेशला मोठा निधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी वर्षांच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी १३ हजार ५३९ कोटी रुपयांची तरतूद  करण्यात आली आहे. यापाठोपाठ गुजरातसाठी ८ हजार ३३२ कोटी रुपये, तर मध्य प्रदेशसाठी १३ हजार ६०७ कोटी रुपयांचीही तरतूद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.