मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये मध्य रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून १२ डब्यांच्या लोकलवर प्रचंड ताण येत आहे. सध्या सीएसएमटी – डोंबिवली, कल्याणदरम्यान १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या धावतात. तर, येत्या काळात सीएसएमटी – कर्जत, कसारा दरम्यान १५ डबा लोकल धावण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी फलाटांची लांबी वाढविणे, पायाभूत कामे हाती घेण्यात आली आहेत. डिसेंबर २०२५ पर्यंत २७ रेल्वे स्थानकांच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्याचा मध्य रेल्वेचा मानस आहे.

मध्य रेल्वेवरील दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून, जादा १५ डबा लोकल फेऱ्या सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आजघडीला सीएसएमटी – कल्याणदरम्यान १५ डबा लोकलच्या सुमारे २२ फेऱ्या चालविण्यात येतात. कल्याण – कसारा, कल्याण – खोपोलीदरम्यान कमी लांबीचे फलाट, १५ डब्यांसाठी सिग्नल यंत्रणेची अपूर्ण कामे, लोकलची देखभाल – दुरुस्ती करणाऱ्या मर्यादित मार्गिका (पिट लाइन) आणि उप मार्गिका (स्टॅबलिंग लाइन) या कारणांमुळे १५ डबा लोकलचे स्वप्न अपूर्ण राहिले होते.

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरातील ३४ स्थानकांच्या विस्ताराचे काम सुरू आहे. तर, २७ स्थानकांच्या विस्तारीकरणाचे काम डिसेंबर अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे १५ डबा लोकल टप्प्याटप्प्याने सुरू होईल. एका लोकलला तीन डबे जोडल्याने वहनक्षमता वाढेल. फलाटाचे विस्तारीकरण करणाऱ्या स्थानकांच्या यादीत शहाड, आंबिवली, टिटवाळा, वासिंद, आसनगाव, आटगाव, तानशेत, कसारा, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शेलू, भिवपुरी, कर्जत, खोपोली, पळसदरी, मुंब्रा, कोपर, कळवा, ठाकुर्ली व इतर स्थानकांचा समावेश आहे.

लोकलमधील गर्दीचा भार वाढल्याने १२ ऐवजी १५ डबा लोकल चालवून प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यात यावी, अशी सूचना प्रवाशांकडून करण्यात येत आहे. सध्या मध्य रेल्वेवर १,८१० लोकल फेऱ्या धावतात. पायाभूत सुविधांअभावी लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करणे शक्य नाही. त्यामुळे कल्याण – कर्जत, कसारादरम्यान पायाभूत सुविधा वाढवून पहिल्या टप्प्यात १२ डबा लोकलच्या १० लोकल १५ डब्यांमध्ये रुपांतरित केल्या जातील. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवण्यात येईल.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ३४ रेल्वे स्थानकांवरील फलाटांचे विस्तारीकरण करण्याचे काम सुरू आहे.डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक नवीन वातानुकूलित लोकल दाखल होईल. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढण्याची चिन्हे आहेत.

१५ डबा लोकलचा प्रकल्प रखडण्याची कारणे सध्या १५ डबा लोकलचे दोन रेक आहेत. या लोकल कुर्ला कारशेड आणि कल्याणच्या मालगाडीच्या यार्डात उभ्या राहतात. तसेच सीएसएमटी येथे उप मार्गिका आहे. याव्यतिरिक्त इतर ठिकाणी लोकल उभी करण्यास जागा उपलब्ध नाही.सीएसएमटीवरील फलाट क्रमांक ७ व्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलाटावर लोकल नेणे किंवा सुटणे सुरक्षेच्यादृष्टीने धोकादायक आहे.

१५ डबा लोकलला फलाटावर दोनदा थांबा देणे सुरक्षेच्या कारणास्तव गैर आहे. तसेच यामुळे लोकलचा वक्तशीरपणा बिघडेल.