दोन हजार झाडांच्या कत्तलीचा वृक्ष प्राधिकरण समितीसमोर प्रस्ताव

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, जलद आणि सुरक्षित प्रवासासाठी उभारण्यात येत असलेल्या ‘मुंबई मेट्रो-३’ प्रकल्पाच्या आरे वसाहत येथे होऊ घातलेल्या कारशेडसाठी तब्बल दोन हजारांहून अधिक वृक्षांची कत्तल करण्याची तयारी सुरू झाली आहे.

वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांनी स्थळ पाहणीही केली असून या वृक्षतोडीला परवानगी मिळावी यासाठी याबाबतचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीच्या ८ ऑगस्टच्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट करण्यात आला आहे. आरे वसाहतीमधील वृक्षतोडीला कडवा विरोध करणारी पालिकेतील सत्ताधारी शिवसेना कोणती भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

रस्ते आणि रेल्वे मार्गावर आलेला ताण हलका करण्यासाठी, तसेच मुंबईकरांना प्रवासासाठी एक पर्याय देण्याच्या उद्देशाने मुंबईमध्ये मेट्रो रेल्वेचे जाळे उभारण्यात येत आहे. मुंबई मेट्रो-३साठी आरे कॉलनीमध्ये कारडेपो उभारण्याचे प्रस्तावित आहे. या कारशेडसाठी आरे वसाहतीमधील मोठय़ा प्रमाणावर झाडांची कत्तल करावी लागणार आहे. त्यामुळे शिवसेना, मनसे आणि अनेक सामाजिक संस्थांनी आरे वसाहतीमध्ये कारडेपो उभारण्यास कडाडून विरोध केला होता.

विविध सामाजिक संघटना आणि समाजसेवकांनी याबाबत केलेल्या तक्रारींवर सुनावणीही घेण्यात आली. तसेच मागविण्यात आलेल्या सूचना आणि हरकतींवरही सुनावणी घेण्यात आली. कारशेडच्या सुधारित आराखडय़ानुसार काही सेवासुविधा कमी करून त्या २५ हेक्टर क्षेत्रात मर्यादित करण्यात आल्या आहेत. कार आगाराच्या आराखडय़ासाठी आरे वसाहतीच्या २.३३ टक्के क्षेत्राची आवश्यकता आहे. कार आगाराच्या आराखडय़ामध्ये बाधित होणारी अत्यावश्यक झाडेच काढण्यात येणार असून दाट झाडांचे पाच हेक्टर क्षेत्र अबाधित ठेवण्यात येणार असल्याची माहिती जनसुनावणीदरम्यान देण्यात आल्याचे वृक्ष प्राधिकरण समितील सादर केलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

२,२३८ वृक्षांची कत्तल

मेट्रो कारशेडसाठी निवडण्यात आलेल्या आरे वसाहतीमधील क्षेत्रात तब्बल ३,६९१ वृक्ष असून यापैकी २,७०२ वृक्ष कारशेडच्या आड येत आहेत. कारशेडआड येणाऱ्या वृक्षांपैकी तब्बल २,२३८ वृक्षांची कत्तल करावी लागणार आहे, तर ४६४ वृक्षांचे पुनरेपण करण्याचे प्रस्तावित आहे, तर ९८९ झाडे ‘जैसे थे’ ठेवण्यात येणार आहेत. कत्तल करण्यात येणाऱ्या झाडांमध्ये टाकळा, चारकोल, सुबाभुळ, गुलमोहर, उंबर, विलायती चिंच, आंबा, उंबर, पिंपरी, सिंगापुरी चेरी, जांभूळ, करंज, समानिया समन, ताड, वड, कदंबा, काटे शेवर, नारीकेल, शेमट, आसना, धामण, बेर, खारोटी आदी विविध जातींच्या झाडांचा समावेश आहे. तोडण्यात येणाऱ्या वृक्षांची भरपाई म्हणून ११,३००, तर सामाजिक जबाबदारी म्हणून ९६०० अशी एकूण २०,९०० झाडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन विभागामार्फत लावण्यात आली आहेत, तर याव्यतिरिक्त सुमारे २,९४६ झाडे आरे वसाहत व अन्य ठिकाणी लावण्यात आल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

शिवसेनेच्या भूमिकेबाबत उत्सुकता

मुंबई मेट्रो-३ची कारशेड आरे वसाहतीमध्ये उभारण्यास शिवसेना, मनसे आणि अनेक सामाजिक संस्थांनी कडाडून विरोध केला होता. पालिकेच्या उद्यान विभागाने वृक्षतोडीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीच्या ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट केला आहे. आरे वसाहतीमधील वृक्षतोडीस विरोध करणारी पालिकेतील सत्ताधारी शिवसेना या प्रस्तावावर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.