वांद्रे येथील एका उच्चभ्रू इमारतीच्या उद्वाहनात एका व्यक्तीने पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून तरुणीशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिस गुन्हा नोंदवून अधिक तपास करत आहेत. वांद्रे पश्चिमेकडील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर २३ वर्षीय तक्रारदार तरुणी राहण्यास आहे.
हेही वाचा >>> ‘ई रक्तकोष’वरील अपुऱ्या नोंदीचा राज्याला फटका, सर्वाधिक रक्तसंकलनानंतरही देशपातळीवर नोंद नाही
रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घरी जाण्यासाठी उद्वाहन थांबवले. त्यावेळी उद्वाहनात एका अनोळखी व्यक्तीने तिला ओळखपत्र दाखवत पोलीस असल्याची बतावणी केली. तसेच, मुलीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर येताच मुलीने घराकडे धाव घेतली. घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगताच त्यांनाही धक्का बसला. त्यांनी तात्काळ उद्वाहनाजवळ धाव घेतली. तोपर्यंत आरोपी पसार झाला होता. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोलीस असल्याच्या बतावणीसह विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहे.