पश्चिम रेल्वेकडून निविदा; १७ कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : अंधेरी रेल्वे स्थानकातील गोखले उड्डाणपूल पाडकामासाठी पश्चिम रेल्वेकडून निविदा जारी करण्यात आली आहे. २ डिसेंबरला निविदा खुली होणार असून रुळावरील गर्डरचा भाग  हटवण्यासाठी ३० तासांच्या मेगाब्लॉकचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे. अंधेरीतील गोखले उड्डाणपूल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पुलाचा रेल्वे हद्दीतील भाग पश्चिम रेल्वेकडून तोडण्यात येणार आहे. तर उड्डाणपूलाच्या पुनर्बाधणीचे काम मुंबई महापालिकेकडून करण्यात येणार आहे. रेल्वे रुळावर येणाऱ्या उड्डाणपुलाचा भाग पाडण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. डिसेंबर अखेपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून जानेवारी २०२३ पासून पूल पाडकामाचे किरकोळ काम सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम टप्प्यात रुळावरील गर्डर हटवण्याच्या कामासाठी ३० तासांचा मेगाब्लॉकचे नियोजनही सुरू करण्यात येत असून त्यामुळे लोकल फेऱ्या आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याचीही शक्यता आहे.

पश्चिम रेल्वेकडून १७ कोटींची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोखले पुलाचे पाडकाम पश्चिम रेल्वे करणार असून हे पाडकाम करण्यासाठी १७.६५ कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी करणारे पत्र पश्चिम रेल्वेने महापालिकेला पाठवले आहे. पूल कोणी पाडायचा यावरून असलेला वाद गेल्या शुक्रवारी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सोडवण्यात आला. त्यात पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे हा पूल पाडला जाणार असल्याचे ठरले. पाडकामाचा खर्च मात्र पालिका उचलणार आहे. रेल्वेची निविदा प्रक्रिया खूप गुंतागुंतीची व वेळखाऊ असते. त्यामुळे प्रत्यक्षात निविदा मागवायला वेळ लागणार आहे. तत्पूर्वी पालिकेने पाडकामाचा निधी रेल्वेला द्यावा असे या पत्रात म्हटले आहे.