मुंबई : ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाच्या ४ हजार ८२ घरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज, सोमवारी सोडत काढण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये दुपारी २ वाजता सोडतीचा आरंभ होईल. या सोडतीत तब्बल एक लाख २० हजार १४४ अर्जदार सहभागी होणार आहेत. ताडदेवमधील सात कोटी किमतींच्या घरांसाठीच्या स्पर्धेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडही आहेत.
‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाची यापूर्वीची सोडत २०१९ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी सोडत निघणार असल्याने इच्छुकांची संख्या वाढत होती. यावरून मुंबई मंडळावर टीका होत होती. अखेर मंडळाने मेमध्ये सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली. नवीन संगणकीय प्रणालीसह काढली जाणारी मुंबई मंडळाची ही पहिलीच सोडत आहे. सोडतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून १ लाख २० हजार १४४ जणांनी अर्ज भरले आहेत. सोडतपूर्व प्रक्रियेला मुदतवाढ दिल्याने १८ जुलैची सोडत लांबली होती. मात्र, सोमवारी ही सोडत पार पडणार असून या वेळी ४ हजार ८२ अर्जदारांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
मुंबई मंडळातील सामाजिक आरक्षणातील ज्या घरांना प्रतिसाद मिळालेला नाही, ती घरे याच प्रवर्गातील इतर अर्जदारांना वर्ग होतात, तर विशेष आरक्षणातील प्रतिसाद न मिळालेली घरे सर्वसामान्य प्रवर्गासाठी वर्ग करण्यात आली आहेत. त्यामुळे ४ हजार ८२ पैकी एकही घर रिकामे राहणार नाही.
पैशांची जुळवाजुळव सुरू करा..
नव्या सोडत प्रक्रियेनुसार सोडतीआधीच अर्जदारांची पात्रतानिश्चिती झाली आहे. पहाडी गोरेगाव येथील २ हजार ६८३ आणि ताडदेवमधील साडेसात कोटींच्या घरांसह अन्य काही घरांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे. या घरांसाठीच्या विजेत्यांना सोडतीनंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून देकार पत्रे पाठवली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ४५ दिवसांत किमतीच्या २५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम वेळेत न भरल्यास मुदतवाढ देत विजेत्यांना व्याजासह रक्कम भरावी लागेल. मुदतवाढीत रक्कम भरली नाही, तर घर रद्द होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोमवारी जे विजेते ठरतील त्यांना पैशांची तातडीने जुळवाजुळव करावी लागणार आहे.