मुंबई : आयटीआय अभ्यासक्रमाची पाचवी विशेष फेरी नुकतीच संपली. या फेरीनंतर आयटीआय अभ्यासक्रमासाठी राज्यात ९१ हजार ५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. पाचव्या फेरीनंतर आयटीआयच्या ५९ हजार जागा रिक्त असून, अद्यापपर्यंत १ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. त्यात नागपूर, नाशिक व पुण्यामध्ये सर्वाधिक जागा रिक्त असून, यामध्ये सर्वाधिक जागा या खासगी आयटीआयमध्ये रिक्त आहे.

राज्यामध्ये आयटीआय अभ्यासक्रमांतर्गत असलेल्या १ लाख ५० हजार ५२ जागांसाठी प्रवेश प्रक्रियेसाठी ८ जुलैपासून सुरुवात झाली. या जागांसाठी नोंदणी केलेल्या २ लाख ५६ हजार ३३८ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ७ हजार १५५ विद्यार्थी कागदपत्रे सादर करून प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत आयटीआय अभ्यासक्रमाच्या चार नियमित व एक विशेष फेरी पार पडली. या पाच फेऱ्यानंतर आयटीआयच्या विविध विभागांमध्ये ९१ हजार ५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर ५८ हजार ९९८ जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्येही सरकारी आयटीआयमध्ये रिक्त जागांचे प्रमाण कमी असून खासगी आयटीआयमध्ये रिक्त जागांचे प्रमाण अधिक आहे.

सरकारी आयटीआयमधील ९६ हजार ७६० जागांपैकी ६९ हजार ७०१ जागांवर प्रवेश झाला असून, २७ हजार ५९ जागा रिक्त राहिल्या आहेत. तर खासगी आयटीआयमध्ये ५३ हजार २९२ जागांपैकी २१ हजार ३५३ जागांवर प्रवेश झाले असून, ३१ हजार ३९२ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यात नागपूर विभागातून सर्वाधिक ११ हजार ९८१ जागा रिक्त आहेत. त्याखालोखाल नाशिकमधून ११ हजार ८७७, पुण्यामध्ये १० हजार ५९८, छत्रपती संभाजी नगरमध्ये ९ हजार ४३२, मुंबईमध्ये ७ हजार ४७९ आणि अमरावतीमध्ये ७२७१ इतक्या जागा रिक्त आहेत. पाचव्या विशेष फेरीनंतर आयटीआय अभ्यासक्रमाच्या ५८ हजार ९९८ जागा रिक्त राहिल्या असून, प्रवेशापासून अद्यापपर्यंत १ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी वंचित असल्याने पुढील फेऱ्यांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

२१ ऑगस्टपासून समुपदेशन फेरी

पाचव्या विशेष फेरीनंतर आयटीआय अभ्यासक्रमाच्या रिक्त राहिलेल्या ५८ हजार ९९८ जागांसाठी २१ ऑगस्टपासून समुपदेशन फेरी होणार आहे. या फेरीसाठी पात्र असलेल्या व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीसाठी विद्यार्थ्यांना २२ व २३ ऑगस्ट रोजी नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संस्थानिहाय गुणवत्ता यादी २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर २५ ते २६ ऑगस्ट या कालावधीत उमेदवाराने निवड केलेल्या कोणत्याही एका संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहून गुणवत्ता क्रमांकानुसार त्याचे समुपदेशन करून त्याला जागा वाटप करण्यात येणार आहे. त्याच कालावधीत विद्यार्थ्यांना आयटीआय संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे.