छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील मुख्य टपाल कार्यालयानजिकच्या मुंबई महानगरपालिकेच्या मनोहरदास स्ट्रीट महापालिका शाळेला मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आणि एकच धावपळ उडाली. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागासह, पोलीस, अग्निशमन दल आणि अन्य यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत शाळा रिकामी केली. मात्र काही क्षणातच इमारत कोसळली आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पाच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. मात्र नवी दिल्ली येथे झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने बचाव कार्याची रंगीत तालीम आयोजित केल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>मुंबई: सोनसाखळी, मोबाइल चोरणाऱ्या पाच सराईत आरोपींना अटक

मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने २९ नोव्हेंबर रोजी भूकंपविषयक घटना घडल्यावर बचाव कार्य कसे करावे याबाबत रंगीत तालीम केली. या तालमीमध्ये महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, मुंबई पोलिस, महानगरपालिकेचा ‘ए’ निभाग, नागरी संरक्षण दल, १०८ रूग्णवाहिका सेवा आणि महानगरपालिकेचे बा.य.ल.नायर रूग्णालय सहभागी झाले होते. तसेच या सरावात विविध १० यंत्रणांतील सुमारे ३०० व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील मुख्य टपाल कार्यालयानजिक असलेल्या मुंबई महापालिकेच्या मनोहरदास स्ट्रीट महानगरपालिका शाळेत ही रंगीत तालीम घेण्यात आली.

हेही वाचा >>>मुंबईः तरुणीचा विनयभंग करून अश्लील चित्रीकरण प्रसारित धमकी

आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामध्ये दुपारी ३ वाजता दूरध्वनी आला. मनोहरदास स्ट्रीट महानगरपालिका शाळेला भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे शिक्षण खात्यातील प्रसासकीय अधिकारी अश्फाक शेख यांनी कळविले. हा संदेश मिळताच आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, पोलीस दल, अग्निशमन दलासह अन्य यंत्रणांतील अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ शाळेची इमारत रिकामी करण्यात आली. सुमारे ६४ विद्यार्थी, १८ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण ८२ व्यक्तींनी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण इमारत कोसळली.कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली पाच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अडकले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या श्वानांची मदत घेण्यात आली. श्वानांनी संकेत दिलेल्या ठिकाणी पाच व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्याचे आढळून आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव कार्य हाती घेऊन या व्यक्तींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. जखमी व्यक्तींना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून नायर रूग्णालयात पाठविण्यात आले.

हेही वाचा >>>मुंबई: मानखुर्दमध्ये तरुणीची आत्महत्या

हे बचावकार्य सुरू असताना परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. काय झाले हे कुणालाच कळत नव्हते. मात्र आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने भूकंपविषयक बचावकार्याची रंगीत तालीम आयोजित केल्याचे समजताच सुटकेचा निश्वास सोडत पादचारी मार्गस्थ होत होते.केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार व सह आयुक्त मिलिन सावंत यांच्या मार्गदर्शानुसार, भूकंप विषयक रंगीत तालीमीचा भाग असल्याचे संचालक महेश नार्वेकर यांनी सांगितले. तसेच रंगीत तालमीत सहभागी व्यक्ती, इमारत आणि आसपासचा परिसर सुरक्षित असल्याची माहिती नागरिकांना देऊन येथील सर्व सेवा पूर्ववत करण्यात आल्या. या रंगीत तालमीत सहभागी झालेल्या कोणत्याही व्यक्तींना दुखापत झालेली नाही. तसेच भविष्यातही विवध आपत्तींविषयीची रंगीत तालीम नियमितपणे घेण्यात येईल, असे नार्वेकर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A exercise of rescue operations by the emergency management department mumbai print news amy
First published on: 30-11-2022 at 19:08 IST