मुंबई : दक्षिण मुंबईतील कर्नाक पुलाचे काम अंतिम टप्प्यात आलेले असतानाच पोहोच रस्त्यांचे काम रखडवल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली आहे. या कंत्राटदाला प्रतिदिन २० लाख रुपये याप्रमाणे आतापर्यंत एक कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. हा पूल १० जूनपर्यंत सुरू करण्याचे पालिका प्रशासनाचे उद्दीष्ट्य होते.

पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील गोखले पुलाचे काम पूर्णत्वास आल्यानंतर आता मुंबई महापालिका प्रशासनाने कर्नाक पूलाचे काम पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या पुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम पूर्ण झाले आहे. मात्र पुलाच्या पोहोच रस्त्याचे काम रखडले आहे. पुलाच्या पोहोच रस्त्यासाठी लागणारे गर्डर म्हणजेच तुळई अद्याप आले नसल्यामुळे पुढचे काम रखडले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने कंत्राटदाराला काम लवकर करण्याबाबत बजावले होते. मात्र पुलासाठीचे गर्डर ३० एप्रिलपर्यंत न आल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील नागरिकांच्या वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक बनल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने त्याच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे.या पुलाचे गर्डर ३० एप्रिलपर्यंत येणार होते. ते न आल्यामुळे १ व २ मे रोजी कंत्राटदारावर प्रतिदिन १० लाख रुपये दंड दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतरही गर्डर आणण्यात अपयशी ठरल्यामुळे कंत्राटदाराला ६ मेपर्यंत प्रतिदिन २० लाख रुपये दंड करण्यात आला.आतापर्यंत कंत्राटदाराला एक कोटी रुपये दंड करण्यात आला आहे. पुलाचे गर्डर येत्या एक – दोन दिवसात आले तरच १० जून रोजी पूल सुरू करता येणार आहे.अन्यथा पूल रखडण्याची शक्यता आहे.

मशीद बंदर रेल्वे स्थानकानजीकच्या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पूर्व दिशेला ८ खांब पूर्ण झाले असून ४० पैकी ५ लोखंडी तुळया (गर्डर) प्रकल्पस्थळी आल्या आहेत. दोन्ही बाजूंचे पोहोच रस्ते ५ जून २०२५ पर्यंत तयार करावे आणि १० जून २०२५ पर्यंत पुलाच्या मुख्य वाहतूक मार्गाचे काम पूर्ण करावे, असे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले