मुंबई : पश्चिम रेल्वेवरील तिकीट धारक प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि चांगली सेवा देण्यासाठी, लोकल, मेल/एक्स्प्रेस, प्रवासी रेल्वेगाड्या आणि सुट्टीच्या विशेष गाड्यांमध्ये सतत तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या जात आहेत. जेणेकरून तिकीट नसलेल्या/अनियमित तिकीट असलेल्या प्रवाशांची संख्या कमी होईल. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. त्यामुळे ८४.२० कोटी रुपये वसूल झाले. वातानुकूलित लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडून १.२० कोटी रुपयांची दंडवसुली करण्यात आली.
पश्चिम रेल्वेने ऑगस्ट २०२५ मध्ये वसूल केलेल्या दंडाच्या वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. तिकीट नसलेल्या/अनियमित तिकीटधारक २.३९ लाख प्रवाशांना शोधून १३.२१ कोटी रुपयांची दंडवसुली करण्यात आली. त्यामध्ये आरक्षित न केलेल्या सामानाच्या प्रकरणाचा समावेश आहे. मागील वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत त्यात १६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई उपनगरीय विभागातील सुमारे ८८ हजार प्रकरणे शोधून वसूल केलेल्या ३.४४ कोटी रुपये दंडाचा त्यात समावेश आहे.
वातानुकूलित लोकलमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी, वारंवार अचानक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या जात आहेत. वातानुकूलित लोकलमध्ये लक्ष केंद्रित केलेल्या मोहिमेमुळे, एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत ३६ हजारांहून अधिक अनधिकृत प्रवाशांवर कारवाई करून १.२० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. जो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ५८ टक्के जास्त आहे.
रेल्वे मंडळाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण
पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. ज्यातून ८४.२० कोटी रुपये वसूल झाले. तसेच, गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुनलेत त्यात जवळजवळ ३५ टक्क्यांची वाढ झाली. रेल्वे मंडळाने ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा १३ टक्के जास्त दंडवसुली झाली आहे. यामध्ये मुंबई उपनगरीय विभागातील २३ कोटी रुपयांचाही समावेश आहे.
गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवाशांचा प्रवास
पश्चिम रेल्वेवरून दररोज १,४०६ लोकल फेऱ्या धावतात. या लोकल फेऱ्यांमधून सुमारे ३० लाख प्रवासी प्रवास करतात. तसेच पश्चिम रेल्वेवर सध्या १०९ वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतात. यामधून दररोज सरासरी १.२६ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, गर्दीचा फायदा घेऊन अनेक विनातिकीट प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करतात. अशा प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.
पश्चिम रेल्वेचे म्हणणे काय ?
पश्चिम रेल्वेच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे अनधिकृत रेल्वे प्रवाशांना रोखता येत आहे. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास सुकर होतो, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.