मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, पर्यावरणाबाबत आपुलकी निर्माण करण्यासाठी, तसेच ते तणावमुक्त राहावे यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये ‘प्राणी कल्याण केंद्र’ सुरू करण्याचे निर्देश अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) दिले आहेत. प्राणी कल्याण केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तणावापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून ‘ॲनिमल थेरपी’बरोबरच प्राणी संरक्षण कायदे, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, शहरी वन्यजीव पर्यावरणशास्त्राचे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांमध्ये भूतदया निर्माण करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
प्राण्यांच्या सहवासामुळे विद्यार्थ्यांमधील आक्रमकता, मानसिक ताण कमी होतो, मानसिकदृष्ट्या विद्यार्थी कणखर होण्यास मदत होत असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. सध्या विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे मन प्राण्यांमध्ये गुंतवून ठेवल्यास त्यांच्या वैयक्तिक आणि शैक्षणिक विकासामध्ये आमूलाग्र बदल होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे प्राणी कल्याणाचा शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये समावेश करण्यात आला आहे. जेणेकरून प्राण्यांचे संरक्षण हे केवळ नैतिक किंवा कायदेशीर बंधन न ठरता विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक संधी निर्माण होईल. यासाठी देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली प्राणी कल्याण केंद्र सुरू करण्याचे निर्देश एआयसीटीईने दिले आहेत.
भारतीय संविधानाच्या कलम ५१अ (छ) मध्ये नागरिकांना सर्व सजीव प्राण्यांप्रती करुणा दाखवण्याचे आवाहन केले आहे. या केंद्रांच्या माध्यमातून तरुणांमध्ये संवैधानिक मूल्यांची जोपासना करण्यास मदत होणार आहे. जागरूकतेच्या अभावामुळे भारतातील अनेक प्राणी संरक्षण कlयदे अद्यापही अंमलात आणले जात नाहीत. या केंद्र समवयस्कांच्या शिक्षण, कायदेशीर साक्षरता आणि सामुदायिक सहभागाद्वारे ही दरी भरून काढण्यास मदत होणार असल्याची माहिती एआयसीटीईचे धोरण आणि शैक्षणिक नियोजन विभागाचे संचालक डॉ. अमित दत्ता यांनी सांगितले.
प्राणी कल्याण केंद्रांमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम
– प्राणी संरक्षण कायदे, पर्यावरणीय नीतिमत्ता, प्राणी रोग आणि प्राण्यांच्या देखभालीसाठी सर्वोत्तम पद्धतीवर व्याख्याने, कार्यशाळा आणि चित्रपट प्रदर्शन.
– संकटात असलेल्या प्राण्यांसाठी सुरक्षित पशुखाद्य क्षेत्र, प्रथमोपचार प्रतिसाद पथक आणि स्थानिक पशुवैद्यकीय रुग्णालये यांच्यासोबत भागीदारी करणे.
– प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि इतर लागू कायद्यांच्या अंमलबजावणीवर अभ्यास मंडळे, कायदेशीर मदत आणि जनहित संशोधन करणे.
– वनस्पती-आधारित आहाराचा प्रचार, प्लास्टिकविरोधी आणि प्राण्यांच्या शोषणाविरुद्ध महाविद्यालयात मोहिमा राबविणे. विविध क्षेत्रात प्राण्यांचा वापर कमी करण्यासाठी नव्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर भर देणे.
– पारंपरिक भारतीय सण वैज्ञानिक, क्रूरतामुक्त पद्धतीने साजरे करणे आणि त्याबद्दल जनजागृती करणे.
– शाळा आणि परिसरात, विशेषतः वारंवार मानव-प्राणी संघर्ष असलेल्या भागात, संवेदनशीलता कार्यशाळा आयोजित करणे.
– स्थानिक पशुवैद्यकीय रुग्णालये, वन विभाग किंवा बचाव आणि आपत्ती व्यवस्थापनात सहभागी असलेल्या संस्थांसोबत आंतरवासिता करण्याची सुविधा उपलब्ध करणे.
– प्राणी संरक्षण कायदा, प्राणीजन्य रोग, नैतिक उपभोगवाद आणि शहरी वन्यजीव पर्यावरणशास्त्र यासारख्या आंतरविद्याशाखीय विषयांवर अंतिम वर्षाचे प्रकल्प व प्रबंधांना प्रोत्साहन देणे.