मुंबई : अंधेरीतील एका व्यापाऱ्याच्या घरातील चोरीचा उलगडा एका निनावी फोनमुळे झाला खरा. पण समोर जे सत्य आले ते ऐकून व्यापाऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली. या चोरीमागचा सूत्रधार एक ब्लॅकमेल करणारा तरूण होता. व्यापाऱ्याच्या अल्पवयीन मुलीला तिचा प्रियकर अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करत होता आणि त्यासाठी ही मुलगी घरातून पैसे चोरत होती. या मुलीने ३ लाख रुपये घरातून चोरले होते. पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करत आहेत.

अंधेरीत राहणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या घरात हा प्रकार घडला आहे. व्यापाऱ्याच्या घरी व्यवसायासाठी लागणारी रक्कम असायची. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरातील पैशांचा ताळमेळ लागत नव्हता. घरातील पैसे गायब होऊ लागले होते. हिशोब चुकत असावा असे त्यांना वाटत होते. तोपर्यंत या व्यापाऱ्याच्या घरातील ३ लाख रुपये गायब झाले होते. मात्र एक दिवस त्यांना एक निनावी दूरध्वनी आला. चोर घरातच असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. हा चोर दुसरा तिसरा कुणी नसून त्या व्यापाऱ्याचीच मुलगी असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. सुरूवातीला कुणी मस्करी करत असावे असे त्या व्यापाऱ्याला वाटले. पण खातरजमा करण्यासाठी त्याने मुलीला बोलावून विचारपूस केली.

…आणि पायाखालची जमीन सरकली…

याबाबत दादाभाई नौरोजी नगर (डीएन नगर ) पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली. त्यानुसार व्यापाऱ्याची १७ वर्षांची मुलगी अंधेरीतील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिच्या वडिलांनी चौकशी केल्यावर ती सुरूवातीला काहीच सांगत नव्हती. नंतर मात्र अधिक चौकशी केल्यावर तिने खुलासा केला. तिचे महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलाशी प्रेमसंबंध होते. त्याच्याकडे या मुलीची अश्लील छायाचित्रे होती. ती छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारितकरण्याची धमकी देऊन तो मुलीला ब्लॅकमेल करत होता. त्यानुसार मुलगी या ब्लॅकमेलकर तरुणाला पैसे देण्यासाठी घरातून पैसे चोरत होती. तिच्या वडिलानी तात्काळ डीएन नगर पोलीस ठाण्यात शनिवारी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात खंडणी तसेच पोक्सोच्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. सध्या मुलगी प्रचंड तणावात आणि नैराश्यात गेली आहे. तिच्या फिर्यादीनुसार आम्ही गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलगाही अल्पवयीन असल्याने त्याला अटक न करता नोटीस दिली आहे. मात्र या प्रकरणात आम्हाला वेगळाच संशय येत आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही मुलाचा मोबाईल जप्त केला आहे. सध्या तरी त्यात अश्लील छायाचित्रे आढळलेली नाहीत. परंतु आम्ही मोबाईल फोन तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) पाठवणार आहोत. तक्रारदार मुलगी आणि आरोपी मुलगा दोघे मित्र आहेत. एवढ्या रकमेचे त्यांनी काय केले आणि यामागे आणखी काही उद्देश आहे का याचा आम्ही तपास करत आहोत. फोन करणाऱ्या निनावी व्यक्तीचाही पोलीस शोध घेत आहेत. सोमवारी पुन्हा या जबाब घेतला जाणार आहे. पुढील चौकशीत नेमका खुलासा होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले.