मुंबई : भारतीय संधिवात संस्थेच्या (इंडियन ह्रमॅटॉलॉजी असोसिएशन) २०२४ च्या अहवालानुसार देशातील तब्बल १८ कोटी नागरिक कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या संधिवाताने त्रस्त आहेत. यापैकी जवळपास ७० टक्के रुग्ण महिला असून ग्रामीण भागात निदानाचा दर अत्यल्प आहे. दरवर्षी १२ ऑक्टोबर रोजी जगभरात ‘जागतिक संधिवात दिन’ साजरा केला जातो. हाडे व सांधे यांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा उद्देश असलेल्या या दिवसाच्या पार्श्वभूमीवर भारतातील चित्र मात्र चिंताजनक आहे.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते संधिवात हा आता केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. चुकीचा आहार, लठ्ठपणा, हालचालींचा अभाव आणि दीर्घकाळ बसून राहण्याची सवय या कारणांमुळे आता तरुण आणि मध्यमवयीन लोकांमध्येही या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ऑस्टिओआर्थ्रायटिस, रुमॅटॉइड आर्थ्रायटिस आणि अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिस हे आज भारतात सर्वाधिक आढळणारे संधिवाताचे प्रकार आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) २०२३ च्या आकडेवारीनुसार ४५ वर्षांवरील प्रत्येक पाचपैकी एक व्यक्तीला सांधेदुखीची समस्या भेडसावते. ऑस्टिओआर्थ्रायटिसच्या रुग्णसंख्येत २०१९ ते २०२४ या कालावधीत २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज अहवालानुसार भारतात रुमॅटॉइड आर्थ्रायटिसचे प्रमाण सुमारे ०.७ टक्के आहे आणि महिलांमध्ये हे प्रमाण पुरुषांच्या दुपटीपेक्षा अधिक आहे. हार्मोनल बदल, प्रसूतीनंतरची हाडांची नाजूकता आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे तज्ञ सांगतात.

महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या २०२४ च्या अहवालानुसार राज्यात तब्बल १.३ कोटी नागरिकांना काही ना काही स्वरूपातील सांधेदुखीचा त्रास आहे. नागपूर, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर या शहरी भागांमध्ये ऑस्टिओआर्थ्रायटिसचे प्रमाण सर्वाधिक असून ग्रामीण भागात रुमॅटॉइड आर्थ्रायटिस व गठिया स्वरूपातील संधिवात वाढत आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य सर्वेक्षणानुसार ४० वर्षांवरील ६५ टक्क्यांहून अधिक महिलांना नियमित सांधेदुखीचा त्रास जाणवतो.अयोग्य आहार आणि हालचालींच्या अभावामुळे संधिवाताचे रुग्ण वाढत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. पूर्वी हा आजार प्रामुख्याने वृद्धांमध्ये दिसत होता, मात्र आता ३० ते ४० वयोगटातील तरुणांमध्येही गुडघेदुखी, हात-पायातील स्टिफनेस आणि सांध्यांमध्ये सूज यांसारखी लक्षणे सामान्य होत असल्याचेहे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

भारतातील जवळपास ३० टक्के लोकसंख्या नियमित व्यायाम करत नाही, तर २५ टक्के लोक स्थूलपणाच्या श्रेणीत येतात. ही दोन्ही कारणे संधिवात वाढविण्यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. शहरी जीवनशैली, वाढता मानसिक ताण, आहारातील असंतुलन आणि दीर्घकाळ संगणकासमोर बसून काम करण्याची सवय हीसुद्धा महत्त्वाची कारणे आहेत. आयसीएमआरच्या सर्वक्षणानुसार नुसार ग्रामीण भागातील ६० टक्क्यांहून अधिक रुग्णांना संधिवाताचे निदान उशिरा होते. सुरुवातीला हा त्रास साध्या सांधेदुखीसारखा वाटल्याने लोक दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे दीर्घकालीन विकलांगतेचा धोका वाढतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात सध्या ३५ कोटींहून अधिक लोक संधिवाताने ग्रस्त आहेत. यामध्ये भारत, चीन, अमेरिका आणि युरोपातील देश अग्रस्थानी आहेत. द लॅन्सेट च्या २०२४ च्या अहवालानुसार २०५० पर्यंत या संख्येत ५० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

भारत सरकारने संधिवातासह मस्युलोस्केलेटनल डिसऑर्डर्स या आजारांचा समावेश राष्ट्रीय आरोग्य योजनेत केला आहे. महाराष्ट्रात २०२५ पासून ग्रामीण भागात मोफत हाड तपासणी शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तज्ज्ञांच्या मते दररोज किमान अर्धा तास चालणे, योगाभ्यास करणे, कॅल्शियम व व्हिटॅमिन डी युक्त आहार घेणे आणि दीर्घकाळ एका स्थितीत बसणे टाळणे हे अत्यावश्यक आहे. प्रारंभीच्या टप्प्यातच योग्य वैद्यकीय सल्ला घेतल्यास रुग्णाला गुडघा बदल शस्त्रक्रियेपासून वाचवता येते.जागतिक संधिवात दिनानिमित्त तज्ज्ञांचे एकमत आहे की संधिवात हा केवळ वयामुळे होणारा आजार नसून आधुनिक जीवनशैलीशी निगडीत विकार आहे. वेळेवर काळजी घेतली, योग्य आहार आणि नियमित हालचाल ठेवली तर हा आजार नियंत्रणात राहू शकतो आणि लाखो लोकांना अपंगत्वापासून वाचवता येईल.