मुंबई: ‘कॅशलेस इंडिया’च्या धर्तीवर प्रत्येक क्षेत्रात डिजिटल पेमेंट व्हावे, यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. मुंबईत बेस्ट उपक्रमाने रोखीविना तिकीटांची देवाणघेवाण करण्यास सुरुवात झाली. यासाठी ‘चलो कार्ड’, ‘चलो ॲप’ सेवा सुरू केली. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून बेस्टचे चलो कार्ड मिळणे बंद झाल्याने, प्रवाशांची गैरसोय होत आहे.

सुट्ट्या पैशांअभावी अनेकदा प्रवासी आणि वाहक यांचे खटके उडतात. त्यामुळे रोखीने व्यवहार टाळून तिकीट आणि पाससाठी ‘चलो कार्ड’ आणि ‘चलो ॲप’ची सुविधा बेस्ट उपक्रमाने सुरू केली. अनेक प्रवाशांनी मोबाइलमध्ये हे ॲप डाऊनलोड केले असून या ॲपच्या माध्यमातून तिकीट काढून प्रवासी बेस्ट बसमधून प्रवास करीत आहेत.

हेही वाचा… काळबादेवीतील रस्त्याला गुन्हेगाराचे नाव? नामकरणाची प्रक्रिया अनधिकृत, पालिका कार्यलयाकडे तक्रार

मात्र, अनेकांना मोबाइल ॲपऐवजी कार्डचा पर्याय सोयीस्कर वाटत आहे. परंतु, सध्या बेस्ट उपक्रमात ‘चलो कार्ड’चा तुटवडा जाणवू लागला आहे. बेस्टच्या वाहकांकडे प्रवाशांकडून कार्डची मागणी केली जाते. मात्र, कार्ड उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. वाहनांना देखील प्रत्येक कार्ड विक्री केल्याने ५० रुपये मिळत होते. आता ही रक्कम मिळणे देखील बंद झाले आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये नाराजी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवासी विहार दुर्वे यांनी माहिती अधिकारांतर्गत ‘चलो कार्ड’च्या तुटवड्याबाबत बेस्ट उपक्रमाकडून माहिती मागितली होती. चलो कार्ड बंद झालेले नाही. कार्डचा साठा कमी झाला आहे. येत्या काही दिवसांत आवश्यक साठा उपलब्ध झाल्यास मागणीनुसार प्रवाशांना कार्ड प्रदान करण्यात येईल. तसेच ‘चलो ॲप’वर चलो कार्डसारखीच सुविधा आहे. चलो कार्ड नसल्याने प्रवाशांनी त्यांचा प्रवास रद्द करण्याच्या घटना घडलेल्या नाहीत, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.