मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी मुंबईत आशा भोसले संगीत अकॅडमी सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे जागेची मागणी केली आहे. त्यांची ही मागणी मान्य करून राज्य सरकारने म्हाडाच्या मुंबई मंडळाला जागेचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई मंडळाने वांद्रे – अंधेरीदरम्यान जागेचा शोध सुरू केला आहे. वांद्रे पश्चिम येथील रंगशारदालगतची जागा आशा भोसले यांना दिली जाण्याची शक्यता आहे.

लवकरच जागा निश्चित करून ती देण्यासंबंधीचा प्रस्ताव मुंबई मंडळाकडून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर आशा भोसले यांना जागा देण्यात येणार असून मग मुंबईत आशा भोसले संगीत अकॅडमी सुरू होईल.

मुंबई मंडळाच्या अभिन्यासातील विविध वापराकरीता आरक्षित असलेले भूखंड आरक्षणानुसार संस्थांना वितरीत केले जातात. मुंबई मंडळाकडून यासाठी नियमानुसार दर आकारणी केली जाते. आतापर्यंत अनेक भूखंड विविध वापरासाठी वितरीत करण्यात आले आहेत. वांद्रे पश्चिम येथील भूखंड नुकताच क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याला अत्यानुधिक क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी दिला आहे.

आता आशा भोसले यांनीही राज्य सरकारकडे संगीत अकॅडमीसाठी जागेची मागणी केली आहे. त्यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले होते. त्यांची ही मागणी मान्य करीत म्हाडाच्या मुंबई मंडळाला जागेचा शोध घेण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. मुंबई मंडळाने वांद्रे – अंधेरीदरम्यान जागेचा शोध घेण्यास सुरुवात केल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.

आशा भोसले संगीत अकॅडमीसाठी किमान २ हजार चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे. इतक्या क्षेत्राच्या जागेचा शोध घेण्यात येत आहे. वांद्रे पश्चिम येथील रंगशारदालगत मुंबई मंडळाचा एक भूखंड आहे. हा भूखंड आशा भोसले संगीत अकॅडमीसाठी निश्चित होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

वांद्रे पश्चिम येथील रंगशारदालगतचा भूखंड वा इतर कोणताही भूखंड निश्चित झाल्यानंतर तो आशा भोसले यांना वितरीत करण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाईल. राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर नियमानुसार भूखंडाचे वितरण करण्यात येईल, असे बोरीकर यांनी सांगितले. आशा भोसले संगीत अकॅडमीत सुरू झाल्यास नवोदित गायक-गायिकांना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल.