मुंबई : नागपूरमध्ये बीए. ५ चा आणखी एक रुग्ण शुक्रवारी आढळला असून सध्या बीए. ४ आणि बीए. ५ च्या रुग्णांची संख्या २६ झाली आहे. नागपूरच्या भारतीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) जनुकीय चाचण्यांमध्ये एका २६ वर्षीय महिलेला बीए. ५ ची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही महिला १९ जून रोजी करोनाबाधित असल्याचे आढळले असून तिला सौम्य लक्षणे होती. तिची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए. ४ आणि बीए. ५ रुग्णांची संख्या २६ झाली असून त्यापैकी पुण्यात १५, मुंबईत ५, नागपूर येथे ४ तर, ठाण्यात २ रुग्ण आढळले आहेत.

वारीमध्ये दक्षता घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येने पाच हजारांचा आकडा पार केला आहे.  राज्यामध्ये सध्या आषाढी वारी सुरू असून लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे आयोजित केलेल्या बैठकीमध्ये सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत करोना स्थितीचा आढावा घेतला. सध्या राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांत प्रामुख्याने करोना रुग्णवाढ दिसत असली तरी आषाढी वारीमुळे करोना प्रसाराचा वेग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे आवश्यक दक्षता घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिली. 

 दैनंदिन रुग्णसंख्येत घट

राज्यात शुक्रवारी ४ हजार २०५ नवे रुग्ण नव्याने आढळले आहेत, तर ३ हजार ७५२ रुग्ण करोनामुक्त झाले. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांची संख्या २५ हजारांपेक्षाही अधिक आहे.  दैनंदिन रुग्णसंख्येत पुन्हा घट झाल्याचे दिसते.

ठाणे जिल्ह्यात ९७८ नवे बाधित

ठाणे :  जिल्ह्यात शुक्रवारी करोनाचे ९७८ नवे रुग्ण आढळले. तर एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली नाही.  ९७८  रुग्णांपैकी नवी मुंबई ३६०, ठाणे ३४२, कल्याण-डोंबिवली १०३, मीरा – भाईंदर ८७, ठाणे ग्रामीण ४५, उल्हासनगर २३, बदलापूर ११ आणि भिवंडी पालिका क्षेत्रात सात रुग्णांची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ६३४ आहे.

मुंबईत  दैनंदिन रुग्णसंख्येत घट : मुंबई:  मुंबईत शुक्रवारी १ हजार ८९८ नवे रुग्ण आढळले. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी शहरात २० हजारांहून जास्त चाचण्या केल्या होत्या. त्यामुळे रुग्णसंख्येने अडीच हजारांचा टप्पा पार केला.  मृत्यू झालेले दोन्ही रुग्ण हे ९० वर्षांवरील होते. यातील एका रुग्णाला उच्च रक्तदाब, तर दुसऱ्या रुग्णाचा हृदयविकार असे दीर्घकालीन आजार होते. सध्या शहरात १३ हजार २५७ रुग्ण उपचाराधीन आहेत.