मुंबई: पूर्वी ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये पाठदुखीची समस्या आढळून येत होती मात्र हल्ली १८ वर्षाच्या तरुणांमध्येही ही समस्या झपाट्याने वाढत आहे. बैठी जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान, नियमित व्यायामाचा अभाव, जास्त काळ एकाच स्थितीत बसणे आणि चुकीची शारीरीक स्थितीमुळे पाठदुखीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. बरोच रुग्ण स्वमर्जीने औषधांचे सेवन करुन पाठदुखीकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे उपचारांना उशीर होतो आणि मणक्याची झीज होते. अशा रुग्णांना हात आणि पाय सुन्न पडणे, अशक्तपणा आणि कायमचे अपंगत्व यासारख्या गुंतागुंतींचा सामना करावा लागतो. यावर वेळीच उपचार केल्यास भविष्यातील गुंतागुंत टाळता येते. ८० ते ९० टक्के पाठदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज नसून योग्य औषधोपचार व फिजिओथरपी तसेच व्यायामाने बरे होता येते असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
नवी मुंबईतील ६० वर्षीय रुग्ण रुकिया बानू या १० वर्षांहून अधिक काळ पाठदुखीने ग्रस्त होत्या. वाढत्या त्रासानंतरही तिने डॉक्टरांकडे जाणे टाळले. त्यामुळे तिची प्रकृती आणखी खालावली आणि ती अंथरुणाला खिळून राहिली तसेच दैनंदिन कामांसाठी तिला तिच्या कुटुंबावर अवलंबून रहावे लागले. काही डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केली मात्र ती टाळाटाळ करत होती. अखेर, तिच्या दोन्ही पायांनाही वेदना होऊ लागल्यानंतर पुन्हा डॉक्टरांकडे गेली असता त्यांनी तिचे योग्य समुपदेशन केले व त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करणयात आली. आज, रुकिया कोणत्याही आधाराशिवाय चालू शकते आणि तिचा पाठदुखी नाहीशी झाली आहे. पूर्वी हा प्रश्न पन्नाशीनंतर निर्माण व्हायचा. आता तरुणांमध्ये पाठदुखीचा व मानदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसतो असे ठाणे जिल्हा रुग्णालयातील ज्येष्ठ अस्थिशल्यचिकीत्सक डॉ विलास साळवे यांनी सांगितले. आमच्याकडे जिल्हा रुग्णालयातही पाठीचा गंभीर त्रास असलेले अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. यातील बहुतेकांना हा त्रास लाईफस्टाईलमुळे निर्माण झाल्याचे दुसून येत. प्रामुख्याने करोनानंतर वर्क फ्रॉम होममुळे हा त्रास वाढल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने संगणकीय म्हणजे कॉम्प्युटरवर काम करणारा वर्ग मोठा आहे. या लोकांनी नियमित थोडासा शाळेत शिकवलेला पीटीचा व्यायाम केला तरी त्यांना पाठदुखीचा त्रास होणार नाही. यासाठी जीममध्ये जाण्याची गरज नसल्याचे डॉ साळवे यांनी सांगितले. ज्या प्रकरणात हातपाय दुखतात अशा प्रकरणात सखोल तपासणी करूनच शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जातो. अन्यथा फिजिओथेरपी व घरी जरी योग्य व्यायाम केला तरी त्रास होणार नाही.
मुंबईतील एक पन्नाशीचा पाठदुखीच्या तीव्र वेदनांमुळे अडीच वर्षांहून पासून चालू शकत नव्हता. त्याचा उजवा पाय सुन्न पडला होता आणि चालकाना तोल जात असे. डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा पण भीतीनमुळे शस्त्रक्रिया करणे टाळत होता. कालांतराने डाव्या पायालाही वेदना आणि बधीरपणा येऊ लागला. शेवटी तिला हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले, जिथे तिची सखोल तपासणी करुन तिला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आणि रुग्ण अगदी दुसऱ्याच दिवशी कोणत्याही आधाराशिवाय चालू लागली. यासारखे अनेक रुग्ण पाठदुखीच्या समस्येशी झुंजत आहेत आणि कित्येक वर्षांपासून पाठदुखीचा त्रास सहन करत आहेत. तुम्हाला तुमच्या रोजच्या कामांमध्ये पाठदुखीचा त्रास होऊ लागला की त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या व उपचारांना सुरुवात करा. वेळीच व्यवस्थापन केल्याने भविष्यातील गुंतागुंत टाळण्यास मदत होते असे ठाण्यातील डॉ जयेश नाईक यांनी सांगितले. पाठीचा त्रास व मानेतील गादी मागे सरकण्याने काही गुंतागुंत निर्माण होते. काही प्रकरणात स्लिप डिस्कचा त्रास होतो.कॉम्प्युटरसमोर तासनतास काम करणे, बैठे काम तसेच व्हिटॅमिन डी ची कमतरता अशा अनेक कारणांनी पाठदुखीचा त्रास होतो. बहुतेक प्रकरणात फिजिओथेरपी व योग्य औषधोपचाराने बरे होता येते. पूर्वी शंभरात एकाला शस्त्रक्रियेची आवश्यकता भासत होती त्या प्रमाणात आता वाढ झाल्याचेही डॉ नाईक यांनी सांगितले.
मुंबई स्थित अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील रोबोटिक स्पाइन सर्जन डॉ. कुणाल भारद्वाज म्हणाले की, पूर्वी आमच्याकडे पन्नाशीनंतरचे रुग्ण उपचारासाठी येत होते. आता तरुणांमध्येही पाठदुखीचे गंभीर रुग्ण पहायला मिळताय. सध्या १८-६५ वयोगटातील व्यक्तींमध्ये पाठदुखीच्या समस्येत झपाट्याने वाढ होत आहे. बरेच रुग्ण पाठदुखीकडे दुर्लक्ष करतात जोपर्यंत ती असह्य होत नाही. शस्त्रक्रियेची भीती ही लोकांना वेळीच मदत घेण्यापासून रोखते. रुग्ण अनेकदा जवळच्या मेडिकलमधून ओव्हर-द-काउंटर औषधे घेऊन पाठ व कंबरेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. ८० ते ९० टक्के पाठदुखीच्या घटना या शस्त्रक्रियेशिवाय औषधं आणि थेरपीद्वारे व्यवस्थापित केल्या जाऊ शकतात. केवळ गंभीर प्रकरणांमध्ये जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शस्त्रक्रियेची शिफारस केली जाते. धूम्रपान तसेच मद्यापानासारखं व्यसन टाळणे, नियमित व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे आणि वजन नियंत्रित राखणे यासारखे जीवनशैलीतील बदल पाठीच्या समस्या टाळण्यासाठी अत्यंत गरजेचे आहेत.