मुंबई : दिवाळीजवळ आली तरी, सानुग्रह अनुदान (बोनस) मिळत नसल्याने बेस्ट उपक्रमातील अधिकारी, कर्मचारी चिंतेत होते. दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान मिळणार नाही, अशी भीती कर्मचाऱ्यांना वाटत होती. परंतु, वसुबारसदिनी बेस्टमधील २३ हजार ५९६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झाले. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बेस्ट उपक्रमाच्या नवनियुक्त महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी यांची बुधवारी बेस्ट वर्कर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी कुलाबा येथील बेस्ट भवन येथे भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, दिवाळी भेट याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी महाव्यवस्थापकांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या दिवाळी भेटी इतकीच रक्कम देण्यात येण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, इतर संघटनांनी दिवाळी भेटीसाठी आंदोलन केले होते. बेस्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शुक्रवारी दिवाळी निमित्ताने ३१ हजार रुपये जमा करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सानुग्रह अनुदानात वाढ करण्यात आली आहे. सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्यामुळे बेस्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाने दिली.