पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल; संबंधितांची कानउघाडणी केल्याची चर्चा
शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भाजपमध्ये बेदिली माजत चालल्याप्रमाणे काही प्रसंग घडत असून त्याची गंभीर दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी जळगावमध्ये केलेली वादावादी, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भगवानगडावरची वक्तव्ये व शक्तिप्रदर्शन आदी बाबी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचल्या असून केंद्रीय सरचिटणीस रामलाल यांनी संबंधितांची कानउघडणी केली असल्याचे समजते. मात्र कोणावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला नाही.
सरकारच्या विविध योजनांमधील लाभार्थीना मदत वाटपासाठी ‘समाधान’ शिबिराचे आयोजन जळगाव जिल्ह्य़ातील जामनेरमध्ये रविवारी करण्यात आले होते. निमंत्रण पत्रिकेत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव वरच्या बाजूला न घेता खाली टाकल्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी शनिवारी गोंधळ घातला. खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे वैमनस्य असून या दोघांच्या समर्थकांमध्ये बरीच वादावादी झाली. शासकीय कार्यक्रमासाठी ‘राजशिष्टाचार’ असतो व निमंत्रणपत्रिकेत मंत्र्यांची नावे वरच्या बाजूला व स्थानिक आमदारांची नावे खालच्या बाजूला असतात, अशी भूमिका शासकीय अधिकाऱ्यांनी मांडूनही खडसे समर्थकांचे ‘समाधान’ झाले नाही व त्यांनी गोंधळ घातला. खडसे यांनी त्यांना उद्युक्त केल्याची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आल्याचे समजते.
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही भगवानगडावर शक्तिप्रदर्शनासाठी सभा घेण्याचा प्रयत्न केल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांना कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी त्याला परवानगी नाकारून सभा गडाखाली घेण्याच्या सूचना पोलिसांना द्याव्या लागल्या. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज झाल्या व त्यांनी गडाखाली जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ‘माझा अभिमन्यू केला जात आहे,’ अशी टिप्पणीही केली. त्यांच्या काही समर्थकांनी ‘अब की बार’ अशी ध्वनिचित्रफीत पसरविण्यास सुरुवात केली असून पंकजा मुंडे हे भविष्यातील खंबीर व आश्वासक नेतृत्व असल्याचे दाखविण्यात आले आहे. एक हजार गावांमध्ये परिवर्तनाचा कार्यक्रम, पालघरमधील कुपोषण रोखण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेली बैठक यासाठी पंकजा मुंडे यांनी दांडी मारली. मुख्यमंत्र्यांशी त्यांचे संबंध ताणले गेले असून काही ज्येष्ठ मंत्री व भाजप नेते त्यात खतपाणी घालत आहेत. या घटनांची माहिती पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्रीय सरचिटणीस रामलाल यांनी काहींची कानउघडणी करून समज दिली असल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले.
वादग्रस्त वक्तव्यांची भर
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मराठा मोर्चासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी वादग्रस्त विधाने केल्याने वाद झाला. जानकर जरी रासपचे असले तरी त्यांच्या वक्तव्याचा त्रास सरकारला झाला. मंत्री व नेते वादग्रस्त विधाने आणि कृती करीत आहेत, त्यांच्यावर मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्षांचा फारसा वचक राहिलेला नाही, हे चित्र शिस्तबद्ध भाजपला फारसे चांगले नाही. त्यातून जनतेमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याने त्यांनी याची गंभीर दखल घेतली असल्याचे समजते.