भाजपाच्या महामेळाव्यामुळे वाहतूक कोंडी झाली असून त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांनी वांद्रे टर्मिन्सहून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाणाऱ्या भाजपाच्या बसेस रोखून धरल्या आहेत. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे. भाजपाने कार्यकर्त्यांना कार्यक्रम स्थळी आणण्यासाठी विशेष बसेसची व्यवस्था केली आहे.

वांद्रयामध्ये तासाभरापासून प्रवासी बस स्टॉपवर थांबून आहेत पण त्यांना बस मिळालेली नाही. अशा अनेक प्रवाशांनी माध्यमांकडे आपला संताप व्यक्त करताना या स्थितीसाठी भाजपाच्या महामेळावा कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

काल भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागतासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती. बाईकवरुन आलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पाच तास वाहतूक कोंडी झाली. अनेकांना नियोजित वेळेत विमानतळापर्यंत पोहोचता आले नाही. आजही अशीच स्थिती आहे.

या मार्गावरुन टाळा प्रवास
मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मोठय़ा संख्येने येणारे कार्यकर्ते आणि वाहने यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता आहे. हे पाहता सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहनांसाठी नियमावली आखून देण्यात आली आहे. मुलुंड पूर्वेकडील आनंद नगर चेक नाका, मुलुंड पश्चिमेकडील मॉडेला चेक नाका, ऐरोली चेक नाका आणि वाशी चेक नाक्यांवर अवजड आणि मालवाहतूक वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासाठी ठाणे शहर, ठाणे ग्रामीण आणि नवी मुंबई पोलिसांनी अवजड आणि मालवाहतूक वाहनचालकांना अन्य मार्गाचा वापर करण्याची सूचना करण्यास सांगण्यात आले आहे. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, एलबीएस रोडवरील सुर्वे जंक्शन, सायन जंक्शन, धारावी टी-जंक्शन, हंसभुग्रा मार्ग, सीएसटी रोड, नेहरू रोड, शारदादेवी रोडवरील प्रवास टाळा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पूर्व उपनगरातील जेव्हीएलआर, एलबीएस रोड आणि ईस्टर्न फ्री वे तर पश्चिम उपनगरातील एस. व्ही. रोड लिकिंग रोड वाहनचालकांसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि प्रवाशांनी त्याप्रमाणे नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे.