दहीहंडीच्या दिवशी मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांचा एक मराठीतला आणि एक हिंदीतला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हिंदीतल्या व्हिडिओत त्यांनी तमाम माता भगिनींचा सन्मान करतो आहे असे म्हणत ‘क्षमा’ मागितली आहे. तर मराठीतल्या व्हिडिओत दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र आपल्या वक्तव्यात माफी हा शब्द त्यांनी कुठेही येऊ दिलेला नाही.

मराठीतला व्हिडिओ

माझे वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आले. मात्र याबाबत कोणतीही सफाई किंवा स्पष्टीकरण न देता मी दिलगिरी व्यक्त करतो असे राम कदम यांनी म्हटले आहे. तर हिंदीमध्ये त्यांनी क्षमा या शब्दाचा वापर केला आहे. मात्र जे बोललो ती माझी चूक आहे मला माफ करा असे राम कदम या दोन्ही व्हिडिओंमध्ये एकदाही म्हटलेले नाहीत. राम कदम यांचे वादग्रस्त वक्तव्य जेव्हा समोर आले त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील तमाम महिलांची माफी मागावी अशी एकमुखी मागणी होते आहे.

काय म्हटले होते राम कदम?
भाजपा आमदार राम कदम यांचा दहीहंडीच्या दिवशी बोलताना ताबा सुटला. उपस्थित तरूणाईशी संवाद साधत असतान ते म्हटले होते की एखाद्या मुलीला तुम्ही प्रपोज केले आणि तिने तुम्हाला नकार दिला. तर त्या मुलाने आपल्या आई वडिलांना आणावे, आई वडिलांनी जर सांगितले की आम्हाला मुलगी पसंत आहे तर मुलीला पळवून आणण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. १०० टक्के मी मदत करेन हा शब्द देतो असेही राम कदम यांनी म्हटले होते. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्नही उपस्थित केला. ज्यानंतर राम कदम यांच्यावर टीकेची झोड उठली.