महाविकास आघाडीतील सत्तारूढ शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये मंगळवारी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. राज्य सरकारने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. मागील अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज भाजपाने मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय. या मोर्चाला ३० ते ४० हजार लोक उपस्थित असतील असा दावा भाजपाने केलाय. मात्र या मोर्चासंदर्भात शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी हा मोर्चा भाजपाला मिळालेल्या पैशांविरोधात असावा असं मत व्यक्त केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राऊत यांनी दिलं खोचक उत्तर…
नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपाने एक मोर्चा आयोजित केलाय, असं म्हणत पत्रकारांनी राऊत यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, “मला असं वाटतं की दाऊदचा हस्तक असणाऱ्या इक्बाल मिर्चीच्या खात्यातून भाजपाला जे काही १०-२० कोटी मिळालेत त्यासाठी सुद्धा हा मोर्चा असावा. कारण त्यांच्या मोर्चा दाऊदच्या विरोधात आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला इक्बाल मिर्चीच्या कंपनीकडून १०-२० कोटी मिळालेत. त्यातून सुद्धा त्यांनी हा मोर्चा काढला असावा,” असा टोला राऊत यांनी लगावला.

काय आहे हे इक्बाल मिर्ची प्रकरण?
याच प्रकरणासंदर्भात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी सक्तवसुली संचलनालयाला म्हणजेच ईडीला पत्र लिहिल्याचा दावा केला होता. यामध्ये गोटे यांनी फडणवीस यांच्याविरोधातील पुरावे आपण ईडीला दिल्याचा दावा केलेला. फडणवीस यांनी एका ड्रग्ज माफिया असणाऱ्या इक्बाल मिर्चीशीसंबंधित असणाऱ्या एका बड्या बिल्डरकडून पैसे घेतल्याचा आरोप गोटे यांनी पत्रातून केला. इक्बाल मिर्ची हा १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी असणाऱ्या दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी आहे.

गोटे नक्की काय म्हणालेत?
गोटे यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांसंदर्भात बोलताना २०१४ पर्यंत इक्बाल मिर्चीशीसंबंधित या बिल्डरने भाजपाला कधी निधी दिला नव्हता असंही म्हटलंय. मात्र राज्यामधील भाजपाची सूत्र फडणवीस यांच्या हाती गेल्यानंतर भाजपाने एरकेडब्यू डेव्लपर्सकडून २० कोटींचा निधी घेतला. ही कंपनी राजेश वाधवान यांच्या मालकीची असून सध्या ते पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी तुरुंगामध्ये आहेत. गोगटे यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेपर्यंत आपल्याला भाजपाला मिळालेल्या या निधीसंदर्भात कल्पना नव्हती असा दावाही गोटे यांनी केला होता. “जर मलिक यांना दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपांवरुन अटक होऊ शकते तर ईडीने हेच तर्क भाजपासाठीही लावलं पाहिजे आणि फडणवीस यांना तातडीने अटक केली पाहिजे. मी यासंदर्भात ईडीला पत्र लिहिलं आहे,” असं गोटे यांनी म्हटलंय.

भाजपाला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कसा येतो?
केंद्रीय यंत्रणांमधील अधिकाऱ्यांचा भांडाफोड केल्यानंतर नवाब मलिक यांच्याविरोधात राजकीय हेतूने पुरावे पेरुन त्यांना अडकवण्यात आल्याचा आरोपही गोटेंनी केलाय. गोटे यांनी या प्रकरणासंदर्भात आपण निवडणूक आयोगाच्या माहितीच्या आधारे भाजपाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भातील माहिती ईडीला पुरावे म्हणून दिल्याचंही म्हटलंय. “निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देणगी देणाऱ्यांची संपूर्ण यादी उपलब्ध आहे. नवाब मलिक यांच्यावर आरोप करण्याआधी फडणवीसांनी दाऊदशी संबंध असणाऱ्या एका व्यक्तीकडून भाजपा एवढ्या मोठ्याप्रमाणात निधी कसा घेते हे सांगावं,” अशी मागणी गोटेंनी केलीय. मलिक यांना अटक झाल्यापासून फडणवीस आणि भाजपाने त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी लावून धरलीय.

फडणवीसांनी फेटाळले आरोप…
फडणवीस यांनी हा निधी एका विकासकाशीसंबंधित संस्थांकडून आला होता. या निधीचा ड्रग्ज प्रकरण किंवा त्यासंदर्भातील व्यवहाराशी काहीही संबंध नव्हता, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. फडणवीसांनी गोटे यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. गोटेंनी उल्लेख केलेल्या कंपन्या कपिल आणि धीरज वाधवान यांच्या असून ते भाजपाला आरटीजीएसच्या माध्यमातून निधी देतात. या प्रकरणाचा इक्बाल मिर्चीची संपत्ती विकत घेण्याशी काहीही संबंध नाहीय, असंही फडणवीस म्हणालेत. डीएचएफएल प्रकरणामध्ये या संपत्तीचा उल्लेख नसल्याचंही फडणवीस म्हणालेत. “मिर्चीसोबत व्यवहार कंपन्या या भाजपाला निधी देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत नाहीयत. इक्बाल मिर्चीसोबत संपत्तीचा व्यवहार करण्यामध्ये सनब्लिंक रिअल इस्टेट आणि मिलेनियम कन्स्ट्रक्शन या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांपैकी एका कंपनीचा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याशी संबंध आहे. खोटे आरोप करणाऱ्यांविरोधात भाजपा मानहानीचा खटला दाखल करणार आहे,” असंही फडणवीस यांनी म्हटलंय.

वाधवान कनेक्शन काय?
वाधवान हे पैशांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आणि त्यामधून २२५ कोटींच्या जमीन व्यवहाराचा खुलासा झाला. सनब्लिक रिअल इस्टेट आणि इक्बाल मिर्चीदरम्यान हा व्यवहार झाला होता. ही कंपनी डीएचएफएलशी संबंधित आहे. ईडीच्या माहितीनुसार हा व्यवहार धीरज वाधवान यांच्या मध्यस्थीने झाला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp must be protesting against funds they got from iqbal mirchi compony says sanjay raut scsg
First published on: 09-03-2022 at 14:43 IST