मुंबई: शिवसेनेची पाळेमुळे ६२ वर्षांहून अधिक काळापासून घट्ट रुजलेली असून ती उघडय़ावर पडलेली नाहीत. त्यामुळे तिला घेऊन जाऊ शकतो अशा भ्रमात कोणी राहू नये. तसेच भाजपच्या कितीही ‘कुळय़ा’ आल्या तरी शिवसेना संपणार नाही, असा इशारा भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा उल्लेन न करता  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विरोधकांना दिला.

 ‘साप्ताहिक मार्मिक’च्या ६२व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांना संबोधित करताना ठाकरे यांनी पुन्हा  राज्य आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने  घर घर तिरंगा फडकविण्याचा कार्यक्रम दिला आहे. पण ज्यांच्याकडे घरच नाही त्यांनी तिरंगा कुठे फडकवायचा, केवळ तिरंगा फडकवणाराच राष्ट्रभक्त होतो का, अशी विचारणा करीत ठाकरे यांनी या मोहिमेवरून केंद्रावर टीकास्त्र सोडले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव दोन दिवसावर येऊन ठेपला असतानाच आपण परत गुलामगिरीकडे चाललो का अशी देशातील परिस्थिती आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी देशात केवळ भाजपच उरेल. शिवसेनेसह सर्व प्रादेशिक पक्ष संपतील अशा आशयाचे केलेले व्यक्तव्य लोकशाहीला घातक आहे.   भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावात किती कुळे आहेत माहीत नाही, पण त्यांची ५२ असो वा १५२ कुळे आली तरी शिवसेना संपणार नाही, असा  टोलाही त्यांनी लगावला.

  अमृत महोत्सव अमृतासारखा असायला हवा. पण सत्तेवर बसलाय म्हणून मनमानीपणे कारभार करण्याला स्वातंत्र्य म्हणत नाहीत. लोकशाही मृतावस्थेत नेण्याचे काम सध्या केंद्राकडून सुरू असून लष्करात कपात करण्याचा निर्णय धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मंत्री सत्कारात मग्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवरही ठाकरे यांनी टीका करताना, राज्यात आपत्ती असताना सरकारचा पत्ता नाही, मंत्र्यांचा पत्ता नाही, मंत्र्यांवर कसलीही जबाबदारी नाही, काही न करताच मंत्री आपले सत्कार करून घेत आहेत. मौजमजा सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.