मुंबई : शक्तिशाली भारत घडवायचा असेल, तर भाजप ‘बलशाली’ असणे आवश्यकच आहे, असे परखड मत व्यक्त करीत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढणार असल्याची ग्वाही ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.

‘पंचायतीपासून संसदेपर्यंत’ भाजपचाच झेंडा फडकला पाहिजे, या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घोषणेमुळे घटकपक्षांना चिंतेचे कारण नाही. लोकसभा-विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही योग्यप्रकारे जागावाटप होईल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

चव्हाण यांनी कार्यकारी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले. ‘पक्षाची ताकद वाढविण्याची प्रत्येक राजकीय पक्षाची इच्छा असते व तसा प्रयत्न नेहमीच केला जातो. आमचे याआधी एक कोटी प्राथमिक सदस्य होते. आता ही सदस्यसंख्या दीड कोटी करण्याचे उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट नेहमीच मोठे ठेवावे लागते व ते आम्ही साध्य करणारच आहोत. पण त्यामुळे मित्रपक्ष किंवा घटकपक्षांना सोडून देऊ, असे निश्चितच नाही’. निवडणुका जाहीर झाल्यावर परिस्थितीनुसार स्थानिक नेत्यांशी चर्चा करून जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल. भाजपचा विचार जनतेमध्ये रुजविणे, यासाठी सदस्यनोंदणी वाढविण्यात येत असून ती निवडणुका जिंकण्याच्या उद्देशाने नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; महायुतीच्या आमदारांशी साधणार संवाद

मंत्रीपदापेक्षा संघटनेत अधिक आनंद

● मंत्रीपदी काम करण्यास अधिक आवडले असते की प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीचा अधिक आनंद आहे, असे विचारले असता चव्हाण म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला विचारणा केली होती. तेव्हा मंत्रीपदापेक्षा संघटनेतील जबाबदारी सांभाळण्यास मला अधिक आवडेल, असे मी सांगितले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● मंत्रीपद हे एखाद्या खात्यापुरतेच मर्यादित असते व त्याबाबतच निर्णयाचे अधिकार असतात. पण संघटनेत काम करताना राज्यातील जनतेचे प्रश्न घेऊन सरकारकडे जाता येते व ते मार्गी लावता येतात, राज्यभरातील कार्यकर्त्यांना भेटता येते. त्यामुळे मंत्रीपदापेक्षा मला संघटनेत काम करण्याचा अधिक आनंद आहे, असेही त्यांनी सांगितले.