मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन येत्या ६ डिसेंबर रोजी आहे. या अनुषंगाने दादर (पश्चिम) परिसरातील चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवा – सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी संबंधित अधिकारी आणि खात्यांना दिले आहेत.

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सर्व नागरी सोयी-सुविधा योग्यप्रकारे मिळतील, यासाठी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी – कर्मचारी आणि सर्व संबंधितांनी विशेष खबरदारी घ्यावी व सजगतेने कार्यतत्पर राहून नेमून दिलेले कार्य वेळेत पूर्ण करावे, असेही गगराणी यांनी नमूद केले.

महापरिनिर्वाण दिन पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवारी आयोजित विशेष आढावा बैठकीदरम्यान गगराणी बोलत होते. महानगरपालिकेद्वारे दादर येथील चैत्यभूमी व छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात अधिक दर्जेदार सेवा सुविधा पुरविण्यात येतील. आवश्यकता असेल, त्या ठिकाणी अधिक प्रमाणात सेवा-सुविधांचे नियोजन करण्याचेही आदेश त्यांनी बैठकीदरम्यान संबंधितांना दिले. तसेच सर्व यंत्रणांनी आपापसात सुयोग्य समन्वय साधून कार्यवाही करावी, अधिकाधिक प्रभावीपणे सेवा-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे आदेशही आयुक्तांनी दिले.

उपायुक्त प्रशांत सपकाळे यांनी प्रास्ताविक करताना महापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध सेवा-सुविधांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. प्रामुख्याने चैत्यभूमी स्मारक, तोरणा प्रवेशद्वार, अशोक स्तंभ, भीमज्योत व परिसराची रंगरंगोटी, उद्यान परिसराचे सुशोभीकरण, अभिवादनासाठी पुष्पचक्र, टेहळणी मनोरा, नियंत्रण कक्ष, भागोजी कीर स्मशानभूमी येथे अनुयायांच्या रांगेसाठी दुतर्फा पडदे, स्थळ निर्देशक फुगा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन, रांगेतील अनुयायांसाठी तात्पुरते छत व आसन व्यवस्था, पोलीस खात्यामार्फत शासकीय मानवंदना, पुष्पवृष्टी, माहिती पुस्तिकेचे प्रकाशन व वितरण, अनुयायांसाठी तात्पुरत्या स्वरूपात जल प्रतिबंधक निवासी मंडप, चैत्यभूमी व छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात माहिती व दिशादर्शक फलक लावणे, मैदानामध्ये धूळ-प्रतिबंधक व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था, वैद्यकीय सेवा-सुविधा, भोजन मंडपाची व्यवस्था, मा. भंतेजींसाठी ध्यान साधना शिबिर कक्ष, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, फिरत्या शौचालयांची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, अग्निशमन दल व्यवस्था, भ्रमणध्वनी चार्जिंग सुविधा आदींची माहिती सपकाळे यांनी दिली.

यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सह महानगर आयुक्त आस्तिककुमार पांडेय, महानगरपालिकेचे संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, तसेच भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर, डॉ. भदंत राहूल बोधी – महाथेरो यांच्यासह क्षसर्वश्री. नागसेन कांबळे, महेंद्र साळवे, गौतम सोनवणे, रमेश जाधव, प्रतीक कांबळे, आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.