मुंबईः हॉटेल सुरू ठेवण्यासाठी व्यावसायिकाकडून ३० हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली मुंबई महापालिकेत कार्यरत स्वच्छता निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. गणेश संंभाजी कदम असे अटक करण्यात आलेल्या स्वच्छता निरीक्षकाचे नाव असून त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी इतर अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का याबाबत एसीबी अधिक तपास करीत आहे. आरोपीने तक्रारदाराला तीन महिने रेस्टॉरन्स सुरू ठेवण्यासाठी ४० हजार रुपयांंची मागणी केली होती, अशी माहिती एसीबीकडून देण्यात आली.
याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या मित्राचे हॉटेल असून मागील एक वर्षापासून ते तक्रारदार चालवित होते. महापालिकेच्या आर-दक्षिण विभागातील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी २४ जून २०२५ रोजी रेस्टॉरन्टमध्ये येऊन तक्रारदारांकडे आरोग्य परवाना व इटिंग हाऊस परवान्याची मागणी केली. तक्रारदारांकडे परवाने नसल्यामुळे संबंधित अधिकाऱ्याने तक्रारदाराच्या रेस्टॉरन्टमधील साहित्य जप्त करून त्यांना रेस्टॉरन्ट बंद करण्यास सांगितले.
जप्त केलेले साहित्य सोडवण्यासाठी २८ जून रोजी तक्रारदार आर-दक्षिण महापिलाका कार्यालयात गेले असता तेथील स्वच्छता निरीक्षक गणेश संभाजी कदम यांनी हॉटेल पुढील तीन महिने सुरू ठेवण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास मॅडम रेस्टॉरन्ट चालवू देणार नाही, असे सांगितले. परंतु तक्रारदार यांना कदम यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १ जुलै रोजी लाचलुचतत प्रतिबंधक विभागाच्या वरळी येथील कार्यालयात उपस्थित राहून लेखी तक्रार केली. याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची सूचना वरिष्ठांनी अधिकाऱ्याना केली.
तक्रारीची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तक्रारीची ९ जुला रोजी पडताळणी करण्यात आली. कदम यांनी हॉटेल सुरू ठेवण्यासाठी तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांची मागणी केली. तसेच तडजोडी अंती ३० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पडताळणीत ते स्पष्ट झाल्यानतर एसीबीने याप्रकरणी आरोपी विरोधात सापळा रचण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार बुधवारी सापळा रचण्यात आला. त्यात ३० हजार रुपये स्वीकारताना कदम यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी कदम यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची एसीबी कोठडी सुनावल्याची माहिती एसीबीने दिली.