प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करी रोड परिसरातील ‘वन अविघ्न पार्क’ इमारतीच्या १९व्या मजल्यावर लागलेल्या आगीच्या घटनेमुळे मुंबईतील बहुमजली इमारती पालिकेच्या रडारवर आल्या आहेत. मुंबईतील बहुमजली इमारतींच्या पुन्हा अग्निप्रतिबंधक यंत्रणेची कसून तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अग्निप्रतिबंधक यंत्रणेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या सोसायटय़ांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे.

CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ

गेल्या तीन-चार दशकांमध्ये मुंबईमध्ये पुनर्विकासाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. अनेक चाळींच्या जागी बहुमजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. बहुमजली इमारतींची संख्या वाढू लागल्यामुळे अग्निशमन दलामध्ये ९० ते १०० मीटर उंचीच्या शिडय़ांसह अग्निशमनासाठी आवश्यक ती अद्ययावत यंत्रणा सज्ज करण्यात आली. तसेच या इमारतींमध्ये सक्षम अग्निप्रतिबंधक यंत्रणा उभारणे बंधनकारक करण्यात आले. गेल्या काही वर्षांमध्ये बहुमजली इमारतींमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अग्निशमनाच्या वेळी संबंधित इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारांची पालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाने गंभीर दखल घेतली आहे.

सरकारमान्य संस्थेमार्फत बहुमजली इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणा सक्षम असल्याचे प्रमाणपत्र जानेवारी आणि जूनमध्ये अग्निशमन दलाला सादर करणे सोसायटय़ांना बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र काही सोसायटय़ा या नियमाला बगल देत असल्याचे आगीच्या दुर्घटनांवरून उघडकीस आले. ‘अविघ्न पार्क’च्या १९ व्या मजल्यावर लागलेल्या आगीची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन नियमांचे पालन न करणाऱ्या सोसायटय़ांविरुद्ध कायद्याचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे.

‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवरक्षक उपाययोजना कायदा २००६’अन्वये बहुमजली इमारतीत अग्निप्रतिबंधक यंत्रणा उभारणे बंधनकारक आहे. त्यामुळे ही यंत्रणा न उभारणाऱ्या सोसायटय़ांविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार खटला दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच मुंबईतील बहुमजली इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणेचा आढावा घेऊन निष्काळजी सोसायटय़ांची यादी तयार करण्यात येणार आहे.

अतिरिक्त ताण

अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी अधूनमधून मुंबईतील बहुमजली इमारतींची तपासणी करीत असतात. नियमित कामे, दुर्घटना आदी विविध  कामे सांभाळून अग्निशमन दलाला उपलब्ध मनुष्यबळानुसार इमारतींची तपासणी करावी लागते. यामुळे दलावर कामाचा अतिरिक्त ताण येऊ लागला आहे, असे अग्निशमन दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवरक्षक उपाययोजना कायदा २००६’तील तरतुदींची बहुमजली इमारतींमध्ये अंमलबजावणी करण्यात आली आहे की नाही याची पाहणी करण्यात येणार आहे. पाहणी दरम्यान त्रुटी आढळल्यास संबंधित सोसायटी कारवाईस पात्र ठरेल.

रमेश पवार, सहआयुक्त (सुधार)