Manoj Jarange Patil Azad Maidan Andolan Mumbai : काही आंदोलकांच्या हुल्लडबाजीमुळे मुंबईकरांना त्रास झाला, त्यांची गैरसोय झाली. जे घडले त्याबाबत मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात आमरण उपोषण करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यातर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात माफी मागण्यात आली. तथापि, आंदोलनाच्या नावे संपूर्ण मुंबईच नव्हे, तर उच्च न्यायालय परिसरही काबीज केला. हे सर्व गंभीर असून बेकायदा आंदोलन करणाऱ्या जरांगे यांनी दुपारी ३ पर्यंत आपल्या समर्थकांसह आंदोलनस्थळ रिकामे करावे आणि मुंबई देखील सोडावी. अन्यथा आम्ही कारवाईचे आदेश देऊ, असा इशारा न्यायालयाने जरांगे यांना दिला. आम्हाला संपूर्ण मुंबई पूर्वपदावर आलेली हवी आहे, असेही न्यायालयाने इशारा देताना स्पष्ट केले.

जरांगे यांनी केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यांना उपोषण, आंदोलन करण्याची परवानगी नाकारली गेली आहे. त्यामुळे त्यांनी आझाद मैदान मोकळे करावे, आम्ही आंदोलन आयोजकांना दुपारी ३ पर्यंतची वेळ देतो. आझाद मैदान मोकळे करा, अन्यथा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल आणि भलामोठा दंडही आकारला जाईल, असेही प्रभारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने जरांगे आणि आंदलनाच्या आयोजकांना बजावले.

काही आंदोलकांमुळे मुंबईकरांना झालेल्या त्रासाबाबत जरांगे यांच्या वतीने वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयाची माफी मागितली. तथापि, आम्ही आंदोलक काय करत होते ते पाहिले आहे. राज्य सरकारनेही ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले त्याबाबतही आम्ही असमाधानी आहोत. फक्त पाच हजार आंदोलकांना पोलिसांनी एका दिवसासाठी परवानगी दिली असताना तुम्ही हजारोच्या संख्येने आलात का ? तुम्हाला मुंबई सोडण्याचे आदेश दिले असताना तुम्ही त्याची अंमलबजावणी का केली नाही ? न्यायालयाच्या आदेशाचे आणि पोलिसांनी दिलेल्या परवानगीचे पालन करण्यासाठी काय प्रयत्न केले ? पाच हजारांपेक्षा अधिक आंदोलक किंबहुना लाख आंदोलक मुंबईत आल्याचे लक्षात आल्यानंतरही त्यांना मुंबई सोडायला सांगितले का ? कोणत्या मार्गाने याबाबत आवाहन केले गेले ? अशी प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने जरांगे यांच्या वकिलांवर केली.

आंदोलकांनी मुंबईच नव्हे, तर उच्च न्यायालयालाही घेराव घातला. याच प्रकरणाची सुनावणी घेण्यासाठी आलेल्या न्यायमूर्तींना आपल्या गाड्या दूरवर सोडून न्यायालयात चालत यावे लागले हे सर्व गंभीर आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, परवानगी नसताना जरांगे हे आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे आणि पोलिसांनी परवानगी देताना घातलेल्या अटींचे उल्लंघन केले आहे. आंदोलकांनी मुंबईत जी हुल्लडबाजी केली ती आणि अन्य गोष्टी लक्षात घेता जरांगे यांनी दुपारी ३ पर्यंत आंदोलनस्थळ आणि मुंबई सोडावी, अन्यथा आम्ही कारवाईचे आदेश देऊ, असा इशारा न्यायालयाने जरांगे यांना दिला.

सरकारकडूनच मुंबईकरांची सुरक्षा वाऱ्यावर

न्यायालयाने यावेळी राज्य सरकारने हे प्रकरण हाताळण्याबाबतही नाराजी व्यक्त केली. हे सर्व घडूच कसे दिले ? अशी विचारणा करताना मुंबईकरांची सुरक्षा कशी वाऱ्यावर आहे हे दाखवण्यासाठी प्रभारी मुख्य न्यायमूर्तींनी आपलाच अनुभव कथन केला. आपण मंगळवारी विमानतळ ते दक्षिण मुंबईतील आपल्या निवासस्थानी येत असताना पोलिसांची एकही गाडी आपल्याला दिसरी नाही. मुंबईत आंदोलक हुल्लडबाजी करत असताना अशाप्रकारे सरकार नागरिकांची सुरक्षा करत होते का ? आम्हाला या सगळ्यांचे ३ पर्यंत स्पष्टीकरण द्या, असे न्यायालयाने सरकारलाही बजावले.