मुंबई: बोरिवली येथील श्रीकृष्ण नगर पुलाची एक बाजू सुरू झाल्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनी आता दुसऱ्या बाजूच्या कामासाठी वन विभागाने परवानगी दिली असून लवकरच दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. हा पूल बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (नॅशनल पार्क) हद्दीत येत असल्यामुळे वनविभागाच्या परवानगीसाठी हे काम रखडले होते. ही परवानगी डिसेंबर महिन्यात मिळाली आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ११.३० मीटर रुंदीच्या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

बोरिवली पूर्वेकडील श्रीकृष्ण नगर येथे दहिसर नदीवरील पूलाचे काम मुंबई महापालिकेच्या पूल विभागातर्फे सुरू आहे. या पुलाचे काम सुरू असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना चार किमीचा वळसा घालून जावे लागत होते. त्यामुळे या पुलाची एक बाजू मार्च महिन्यात खुली करण्यात आली होती. मात्र पुलाच्या उर्वरित बाजूसाठी वनविभागाची परवानगी लागणार असल्यामुळे या पुलाचे काम रखडले होते. या परवानगीअभावी या कामाला सुरूवात झाली नव्हती. पुलाच्या कामावरून व उद्घाटनावरून गेल्यावर्षी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक व भाजपचे लोकप्रतिनिधी यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे या पुलाचे काम चर्चेत आले होते. पुलाच्या अर्ध्या भागाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र या पुलाच्या दुसऱ्या भागासाठी परवानगीची आवश्यकता होती. त्यामुळे दुसऱ्या भागांचे काम रखडले होते.

हेही वाचा >>>मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर उद्या दोन तासांचा वाहतूक ब्लॉक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय गांधी उद्यानाकडील बाजूसाठी वनविभागाची परवानगी मिळवण्याकरीता पालिका प्रशासनाचा पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार वन विभागाच्या हद्दीतील ०.०७२८ हेक्टर वन जमिनीच्या वापरासाठी भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये मंजूरी दिली होती. नागपूर प्रादेशिक कार्यालयाने हे परवानगीचे पत्र दिले होते. मात्र राज्य सरकारच्या पश्चिम वन्यजीव क्षेत्र विभागाची परवानगी मिळणे बाकी होते. ती परवानगी देखील डिसेंबरमध्ये मिळाली असून याता या पुलाचे उर्वरित काम मार्गी लागणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात श्रीकृष्ण नगर, अशोकवन, हनुमान टेकडी, काजूपाडा, रावळपाडा आदी विभागातील नागरिकांचा वाहतूकीचा त्रास कमी होणार आहे.