व्यावसायिक शत्रुत्त्वातून बॉम्बे डाईंगचे तत्कालीन प्रमुख नस्ली वाडिया यांच्या हत्येचा कथित कट रचल्याचा आरोप असलेल्या आरोपीने प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना खटल्यात साक्ष देण्यासाठी पाचारण करण्याची मागणी विशेष न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयाने आरोपीच्या याबाबतच्या अर्जाची दखल घेऊन केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) त्यावर उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

हे प्रकरण १९८८ सालचे आहे. या प्रकरणातील आरोपी इव्हान सिक्वेरा याने विशेष सीबीआय न्यायालयासमोर अर्ज केला आहे. त्यात त्याने अंबानी यांना साक्षीदार म्हणून पाचारण करण्याची आणि त्यांची साक्ष नोंदवण्याची मागणी केली आहे.न्यायालयाने २००३ मध्ये कीर्ती अंबानी, अर्जुन बाबरिया, सिक्वेरा आणि रमेश जगोठिया यांच्यावर वाडिया यांच्या हत्येचा कथित गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप निश्चित केला होता. परंतु चार आरोपींपैकी दोघांचा खटला प्रलंबित असतानाच मृत्यू झाला होता तर अन्य दोन आरोपी जामिनावर आहेत.

कीर्ती अंबानी हा अंबानी समुहाच्या मालकीच्या कंपनीत वरिष्ठ अधिकारी असल्याचे म्हटले जात होते. तसेच त्याच्यावर गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता. कीर्तीचा २०१७ मध्ये मृत्यू झाला. जगोठियावर जुलै १९८९ मध्ये देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर बाळगल्याप्रकरणी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणात २०१६ मध्ये वाडिया हे साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर झाले होते. जूनमध्ये न्यायालयाने सिक्वेराच्या पोलीस संरक्षण पूर्ववत करण्याबाबत आदेश दिले होते. सिक्वेराला २०१५ मध्ये पोलीस संरक्षण देण्यात आले होते. मात्र मे महिन्यात ते काढून घेण्यात आले होते. आपणच खरे पीडित आहोत, असा दावा सिक्वेराचा आहे. कटाच्या संदर्भात सगळी माहिती देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.