मुंबई : मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसाठी सीएसएमटी ते भायखळा दरम्यान घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून बुधवारी एका वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड झाल्याने त्या लोकलच्या सहा वातानुकूलित फेऱ्या रद्द करण्यात आल्या. सामान्य लोकलच्या तिकिटापेक्षा जवळपास पाचपट अधिक किंमत मोजूनही प्रवाशांना हालच सोसावे लागले.

मध्य रेल्वेने वातानुकूलित लोकल चालवण्यास सुरुवात केली. सुरूवातीला तिकिट दरातील तफावतीमुळे प्रवाशांकडून कमी प्रतिसाद असला तरी आरामदायक प्रवास, तुलनेने कमी गर्दी यांमुळे वातानुकुलित लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला. सध्या मध्य रेल्वेवर ६६ वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतात. वातानुकुलित लोकल कमी असल्यामुळे त्याने प्रवास करायचा असल्यास प्रवाशांना नियोजन करूनच स्थानक गाठावे लागते. मात्र, गाड्यांना होणारा उशीर, गाड्या अचानक रद्द होणे अशा मध्यरेल्वेच्या कारभारामुळे प्रवाशांच्या नियोजनाचा अनेकदा बट्ट्याबोळ होतो. शिवाय तिकिटाची अतिरिक्त रक्कमही वाया जाते. वातानुकूलित लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बुधवारी अप आणि डाऊनच्या सहा लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

सकाळी गर्दीच्यावेळी वातानुकुलित लोकल ऐनवेळी रद्द करण्यात आली. त्या ऐवजी सामान्य लोकल चालवण्यात आली. त्यामुळे वातानुकूलित लोकलचे तिकीट खरेदी केलेल्या प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला. ठाणे, टिटवाळा, डोंबिवली, कल्याणवरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या आणि सीएसएमटी, दादरवरून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या वातानुकूलित लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. वातानुकूलित लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर त्या जागी दुसरी वातानुकूलित लोकल चालवणे अपेक्षित आहे. मात्र, त्याऐवजी फेऱ्या रद्द करण्यात येतात. त्यामुळे वातानुकूलित लोकलचे पास असलेल्या आणि तिकिटे काढलेल्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होते. याबाबत रेल्वे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या कमी आहेत. त्यामुळे कामाच्या वेळा सांभाळून, वातानुकूलित लोकलच्या वेळेत प्रवास करतात. अनेक प्रवाशांचा प्रवास फक्त दिवसातून एकदाच वातानुकूलित लोकलमधून होतो. त्यामुळे पासधारक प्रवाशांचे आर्थिक नुकसान होते. वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड झाल्यास मध्य रेल्वेकडून थेट वातानुकूलित लोकल रद्द करून त्या वेळेत सामान्य लोकल चालवली जाते. त्यामुळे वातानुकूलित लोकलचे पास घेणाऱ्यांचे तिकिटाचे पैसे वाया जातात. तांत्रिक बिघाडामुळे होऊन वातानुकूलित लोकल धावणार नाही, त्यादिवसाचे पैसे परत करण्यात यावेत अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.