मुंबई : मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर रेल्वे सुरू होणार की नाही याबाबत कोणतीही माहिती नसल्याने रेल्वे रुळावरून चालत जात असलेल्या काही प्रवाशांना लोकलने सॅंडहर्स्ट रोड येथे धडक दिली. या अपघातात एका तरुणीसह दोघे ठार झाले, तर दोन महिलांसह तीन प्रवासी जखमी झाल्याची माहिती जे.जे. रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

सॅंडहर्स्ट रोड येथे गुरुवारी सायंकाळी ६.५० च्या सुमारास रेल्वे रुळावरून चालत जात असलेल्या प्रवाशांना लोकलने धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र यापैकी दोघांचा रुग्णालयामध्ये नेण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. मृतांपैकी एका तरुणीचे नाव हैली मोहमाया (१९) आहे. तर अन्य ४५ वर्षीय पुरुषाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.

तसेच या अपघातात जखमी झालेल्या तिघांपैकी कैफ चोगले (२२), हाफिजा चोगले (६२) यांनी रुग्णालयात उपचार घेण्यास नकार दिला. तर खुशबू मोहमाया (४५) यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जखमीपैकी एका प्रवाशाचा खांदा निखळला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.