मुंबई : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुटी पडली असून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. परिणामी, नियमित प्रवाशांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांची भर पडली आहे. एकूणच रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली असून गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडू नये, स्थानकात गर्दी कमी व्हावी यादृष्टीने मध्य रेल्वेने फलाट तिकीट विक्रीवर निर्बंध घातले आहेत. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), कल्याण, पुणे येथे फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने उन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नियमित रेल्वेगाड्यांव्यतिरिक्त सुमारे १,२०४ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या घोषित केल्या आहेत. यामध्ये २९० अनारक्षित रेल्वेगाड्या आणि ४२ वातानुकूलित उन्हाळी विशेष रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी आणि मागणीनुसार विविध मार्गांवर अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील विविध भागात विशेष रेल्वेगाड्या चालविल्या आहेत. त्याचबरोबर उत्तर आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई महानगरातील प्रमुख टर्मिनसवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी होऊ लागली आहे. प्रवाशांच्या अनुचित प्रकार घडू नये यासाठी मध्य रेल्वेने विशेष खबरदारी घेतली आहे.

महाकुंभ, छठपुजेदरम्यान चेंगराचेंगरी

नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी भाविकांची रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी केली होती. महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी भाविकांनी रेल्वेला प्राधान्य दिले होते. त्यातच फेब्रुवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी होऊन अनेकांचा मृत्यू झाला. तसेच ऑक्टोबर २०२४ रोजी छठपुजेच्या कालावधीत पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस येथे रेल्वेगाडीत चढताना प्रवाशांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यांचे रुपांतर चेंगराचेंगरीत झाले आणि अनेक प्रवासी दगावले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता खबरदारीची पावले उचलण्यात आली आहेत.

फलाट तिकीट विक्रीवर १५ मेपर्यंत निर्बंध

मध्य रेल्वेने उन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन निवडक प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध घातले आहेत. फलाटावर गर्दीचे नियंत्रित करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करणे हे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे. फलाट तिकिटांच्या विक्रीवर १५ मे २०२५ पर्यंत तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

‘या’ प्रवाशांना सवलत

वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवाशांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

उन्हाळ्याच्या सुटीतील प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी प्रवाशांनीही योग्य ते नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.