मध्य रेल्वेवरील सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या जलद लोकलचे वेळापत्रक गुरुवारी सकाळपासून विस्कळीत झाले. परिणामी, प्रवाशांना मोठा मनस्ताप सोसावा लागला. धुक्यामुळे मुंबईत येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांना सुमारे एक ते चार तास विलंब झाल्याने लोकल वेळापत्रकाला त्याला फटका बसल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

हेही वाचा- वेणूगोपाळ धूत यांची अटक कायद्यानुसारच; अटकेला आव्हान देणारा धूत यांचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला

या लोकल उशिराने धावत असल्याची उद्घोषणा कल्याण, डोंबिवली, ठाण्यासह अन्य जलद मार्गावरील स्थानकांत करण्यात येत होती. गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे मध्य रेल्वेवरील लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे. गुरुवारीही सकाळी ७ पासूनच सीएसएमटी दिशेने येणाऱ्या जलद लोकल विलंबाने धावू लागल्या. त्यानंतर सकाळी ११ पासून या लोकलचे वेळापत्रक अधिकच बिघडले आणि सीएसएमटीकडे येणाऱ्या जलद लोकल २५ ते ३० मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे लोकल गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी झाली. गर्दीमुळे काही प्रवाशांना लोकल डब्यात प्रवेशही करता येत नव्हता. लोकल उशिराने धावत असल्याची उद््घोषणा काही स्थानकांत होत होती. मात्र त्यामागील नेमके कारण प्रवाशांना सांगण्यात येत नव्हते.मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत येताना उत्तर भारत तसेच महाराष्ट्रातील काही पट्ट्यात पहाटे मोठ्या प्रमाणात धुके असल्याने मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या लोको पायलटना रुळ, सिग्नल दिसण्यास अडचणी येत होत्या.

हेही वाचा- मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला जाण्याची परवानगी द्या; वरवरा राव यांची उच्च न्यायालयात याचिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गाड्या काही पट्ट्यातून येताना हळूहळू पुढे सरकत होत्या. परिणामी, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या एक तास ते चार तास विलंबाने धावत होत्या. अशा बारा मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. गाडी क्रमांक २२१०८ लातूर-सीएसएमटी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२१३८ पंजाब मेल, गाडी क्रमांक ०१०२८ गोरखपूर-दादर विशेष, गाडी क्रमांक ११००६ चालुख्य एक्स्प्रेस यासह अन्य मेल-एक्स्प्रेसचा समावेश होता. या गाड्यांनी मुंबईत प्रवेश केल्यानंतर त्यांना पुढे मोकळा मार्ग मिळावा, यासाठी मेल-एक्स्प्रेस जलद लोकल मार्गावरून चालवण्याचा पर्याय निवडण्यात आला. परिणामी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या मार्गांवरील लोकलही पाच ते दहा मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे लोकल गाड्यांना गर्दी झाली होती.