मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील मोटरमनला स्वेच्छानिवृत्ती घेणे कठीण झाले आहे. अनेक मोटरमनांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी वारंवार अर्ज केले असून त्यांचा अर्ज मंजूर केला जात नाही. त्यामुळे मोटरमनला शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मोटरमनला स्वेच्छानिवृत्ती न दिल्याने मोटरमनसह लाखो प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने (सीआरएमएस) व्यक्त केले. यासह विविध मागण्यांसाठी मोटरमन, लोकल व्यवस्थापक शुक्रवारी धरणे आंदोलन करणार आहेत.
मध्य रेल्वेचे मोटरमन, लोको पायलट, लोकल व्यवस्थापक, सहाय्यक लोको पायलट सातत्याने मानसिक दबावाखाली आहेत. अन्यायकारक आदेश, असह्य कामाच्या पद्धती आणि अवास्तव अपेक्षांमुळे कर्मचारी बळी पडत आहेत. या अन्याय आणि शोषणाविरोधात सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे सीएसएमटी समोर धरणे आंदोलन होईल. अनेक मोटरमन विविध आजारांनी ग्रासले आहेत. त्यामुळे या मोटरमननी स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली आहे. परंतु, प्रशासन ही मागणी मान्य करीत नाही.
त्यामुळे धरणे आंंदोलनात या मुद्दा प्रकर्षाने मांडला जाणार आहे. मोटरमन कर्तव्यावर जाताना त्यांची श्वास विश्लेषक (बीए) चाचणी केली जाते. यावेळी काही मोटरमनची चाचणी सकारात्मक आल्यास, त्याला पुन्हा बीए चाचणी करण्यासाठी दुसरी संधी देण्यात यावी.
मोटरमन, लोको पायलट, लोकल व्यवस्थापक, सहाय्यक लोको पायलट यांच्या कार्यालयाची आणि खोलीची स्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे यात सुधारणा करण्यात यावी. वगळलेल्या श्रेणीसाठी अतिरिक्त भत्ता, विविध प्रलंबित भत्ते देण्यात यावेत, अशी मागणी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने केली आहे.